पोलीस भरती प्रक्रियेला पोलीस प्रशासन सज्ज

पोलीस भरती प्रक्रियेला पोलीस प्रशासन सज्ज

पालघर: पालघर जिल्ह्यात उद्या २११ पोलीस शिपाई पदांसाठी आणि ५ वाहन चालक या जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया संपन्न होणार आहे. पालघर जिल्ह्यातील कोळगाव येथील पोलीस मैदानावर ही भरती प्रक्रिया संपन्न होणार आहे.पहिल्या स्तरांवर पाच वाहन चालक या पदासाठी दोन दिवस ही निवड प्रक्रिया होणार असून उर्वरित २११ पोलीस शिपाई पदांसाठी ही निवड प्रक्रिया १९ जानेवारीपर्यंत होणार आहे. एकूण २१६ जागांसाठी ही निवड प्रक्रिया संपन्न होणार आहे. जिल्ह्यातील पोलीस भरतीसाठी 12 हजार 74 अर्ज प्राप्त झाले आहेत.शिपाई पदासाठी 11 हजार 519 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यात 9 हजार 529 पुरूषांचे तर 1 हजार 990 महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. चालक पदासाठी 555 अर्ज प्राप्त झाले आहेत.

चालक पदासाठी आठ महिलांनी अर्ज केल्याची माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली. भरती प्रक्रिया राबवण्यासाठी पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली नऊ पोलीस निरीक्षक,53 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक,वीस कार्यालयीन कर्मचारी मिळून चारशे कर्मचार्‍यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सोमवारी चालक पदाच्या उमेदवारांची शारीरिक चाचणी केली जाईल. मंगळवारी परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत चालक पदाच्या उमेदवारांची कौशल्य चाचणी करण्यात येणार आहे.बुधवारपासून शिपाई पदाच्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

First Published on: January 1, 2023 10:40 PM
Exit mobile version