वसईमध्ये प्रदूषण वाढले, मुंबई -अहमदाबाद महामार्ग सापडला विळख्यात

वसईमध्ये प्रदूषण वाढले, मुंबई -अहमदाबाद महामार्ग सापडला विळख्यात

विरार: मुंबई- अहमदाबाद महामार्ग हा वायु प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. मोठ्या प्रमाणावर समस्यांनी ग्रासलेल्या या महामार्गावर आता नागरिकांना अशुद्ध हवेचा सामना करावा लागत असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे.
वसई पूर्वेतून मुंबई अहमदाबाद महामार्ग गेला आहे. गेल्या काही वर्षांपासून राहण्यासाठी सर्वोत्तम शहर म्हणून वसई तालुक्याला पसंती दिली जात आहे. त्यामुळे येथील विकासही झपाट्याने होत असल्याने महामार्गावरून प्रवास करणार्‍या नागरिकांची संख्या ही मोठी आहे. असे असले तरी दुसरीकडे याच महामार्गावर दिवसेंदिवस अतिवाईट, अशुद्ध हवा नागरिकांना मिळत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून मुंबई- अहमदाबाद महामार्गावर हवा गुणवत्ता निर्देशांक हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

एकंदरीत या अतिवाईट हवेमुळे वसईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
वसई पूर्वपट्ट्यात औद्योगिक वसाहती मोठ्या प्रमाणावर असल्याने या कंपन्यांकडून रसायनमिश्रित प्रदूषित हवा अशीच वातावरणात सोडली जाते. रात्रीच्या वेळी हे प्रमाण अधिक वाढताना दिसत आहे. तसेच महामार्गावर जागोजागी कचरा जाळण्याचे प्रकारही घडत असल्याने धुराचे लोट निर्माण होतात. महामार्गालगत माती भरावाचे काम सुरू असल्याने त्या ठिकाणी निर्माण होणार्‍या धुरळामुळेही हवेत धुलीकण मिश्रित होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण दिसून येत आहे. हवेच्या प्रदूषणात औद्योगिकीकरणाबरोबरच स्वयंचलित वाहनांचा सर्वांत मोठा वाटा आहे. या वाहनांमधून प्रामुख्याने जीवाश्म इंधनाचा वापर होत असल्याने धुरावाटे नायट्रोजन, सल्फर, कार्बन यांसह घातक वायू हवेत मिसळत आहेत. हे घटक मानवी आरोग्यास घातक ठरतात. जिवाश्म इंधनामुळे धुलिकणांमध्येही वाढ होत आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा विचार निर्माण झाला असून नागरिकांमध्ये एकच घबराट निर्माण झाली आहे.

 

आरोग्यावरील दुष्परिणाम:
– सल्फरच्या विविध प्रकारांमुळे श्वसनाचा दाह, दमा, ब्राँकायटीस असे श्वसनाचे विकार होतात.
– नायट्रोजनमुळे श्वसनसंस्थेवर गंभीर परिणाम होतात.
– कार्बन मोनोक्साईड रक्तातील हिमोग्लोबिनबरोबर मिसळतो आणि रक्ताची ऑक्सिजन वहनाची क्षमता कमी करतो.
– धूर आणि धुक्यांच्या मिश्रणातून तयार होणार्‍या धुरामुळे दृष्टिक्षमतेवर परिणाम, डोळ्यांची जळजळ आणि खोकला असे आजार होतात
– हवेच्या प्रदूषणामुळे खरूज, त्वचेवर पुरळ येतात

First Published on: December 8, 2022 8:53 PM
Exit mobile version