महापालिकेच्या ११९ कर्मचाऱ्यांना पदोन्नती

महापालिकेच्या ११९ कर्मचाऱ्यांना पदोन्नती

वसई : वसई-विरार महापालिकेतील अनेक वर्षांपासून रखडलेल्या ११९ कर्मचार्‍यांना वरिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. वसई, विरार, नालासोपारा व नवघरमाणिकपूर या चार नगर परिषदांसह ५५ महसुली गावांचा समावेश असलेल्या महापालिकेची स्थापना ३ जुलै २००९ रोजी झाली होती. तेव्हापासून महापालिकेमध्ये तत्कालीन चार नगरपरिषदा आणि ग्रामपंचायतीत लिपिक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना सामावून घेण्यात आले होते. मात्र, त्यांना पदोन्नती देण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेक कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहून सेवानिवृत्त झाले होते. त्यामुळे कर्मचार्‍यांवर अन्याय होत होता.

अखेर विद्यमान आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार यांनी पदोन्नतीचा विषय मार्गी लावल्याने तब्बल ११९ कर्मचार्‍यांना वरिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती मिळाली आहे. महाराष्ट्र अधिनियमानुसार नगरपालिकेच्या आणि स्थानिक प्राधिकरणाच्या नोकरीत असलेले सर्व कर्मचारी महापालिकेत वर्ग झालेले आहेत. महापालिकेच्या मंजूर आकृती बंधानुसार महापालिकेच्या आस्थापनेवरील ११९ पात्र लिपिक टंकलेखक कर्मचार्‍यांना सेवा जेष्ठतेनुसार वरिष्ठ लिपिक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक या पदावरून मुख्य आरोग्य निरीक्षक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

First Published on: April 20, 2023 10:24 PM
Exit mobile version