केंद्र व राज्य सरकार विरोधात मच्छिमारांचा मंत्रालयावर आक्रोश मोर्चा

केंद्र व राज्य सरकार विरोधात मच्छिमारांचा मंत्रालयावर आक्रोश मोर्चा

भाईंदर : अरबी समुद्रात मासेमारी करून आपली उपजीविका भागावणार्‍या मच्छीमारांच्या पोटावर पाय देत त्याठिकाणी वाढवण बंदर येणार असल्याने मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्याला विरोध म्हणून वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती, नॅशनल फिशवर्कर्स फोरम, महाराष्ट्र मच्छिमार कृति समिती, ठाणे जिल्हा मच्छिमार मध्य. सहकारी संघ लि., ठाणे जिल्हा मच्छिमार समाज संघ, पालघर तसेच कष्टकरी व आदिवासी एकता परिषद या संघटनांच्या नेतृत्वाखाली सोमवार २१ नोव्हेंबर रोजी जागतिक मच्छिमार दिनाच्या दिवशी सकाळी १० वाजता वाढवण बंदराविरोधात मंत्रालयावर केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागत दहा हजारच्या वर मासेमारी नौका नोंदणीकृत आहेत. सन २०२२-२३ मध्ये ७१३१ नौकांची संख्या आहे. ही संख्या कमी होत असल्याचे कारण १२० हॉर्सपावर व त्यावरील हॉर्सपावर असलेल्या तीन हजारपेक्षा जास्त मासेमारी नौकांना डिझेल कोटा मंजूर केला नसल्यामुळे संख्या कमी होत आहे.
यांच्यातील पालघर, ठाणे, मुंबई येथील हंगामानुसार साडे सहा ते साडे सात हजार मासेमारी नौका या समुद्र क्षेत्रात मासेमारी करतात. हे सागरी क्षेत्र प्रजनन, मत्स्य संवर्धन, जैविक विविधता करिता तसेच मासेमारी साठी गोल्डन बेल्ट परिसर आहे. हेच क्षेत्र हिरावून पाच लाखांहून अधिक मच्छिमार व त्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांचा उदरनिर्वाह हिरावून मच्छिमार, शेतकरी, बागायतदार आदिवासी, डायमेकर यांना देशोधडीला लावणार्‍या वाढवण बंदरास विरोध करण्यासाठी जागतिक मच्छिमार दिनाच्या दिवशी २१ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता गिरगांव चौपाटी (तारापोरवाला मत्स्यालय) ते आझाद मैदान मोर्चा काढण्यात येणार असून त्यानंतर आझाद मैदानात सभा घेण्यात येणार आहे अशी माहिती किरण कोळी सरचिटणीस, महाराष्ट्र मच्छिमार कृति समिती यांनी दिली आहे. तर यामध्ये सदरील विरोध प्रदर्शनास मीरा -भाईंदर मधील उत्तन, चौक व भातोडी बंदर, पाली, वसई व पालघर जिल्ह्यातील मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

First Published on: November 8, 2022 9:48 PM
Exit mobile version