रेल्वेचा क्यूआर कोड अवैध जाहिरातबाजांकडून ऑफलाईन हॅक

रेल्वेचा क्यूआर कोड अवैध जाहिरातबाजांकडून ऑफलाईन हॅक

मानसी कांबळे,विरार : देशात दिवसेंदिवस आधुनिकीकरण वाढत असून सरकार नागरिकांच्या सेवेसाठी नवीन सोयी आणि सुविधा आणण्याचा प्रयत्न करत असते. सध्या रेल्वे स्थानकावर तिकीट काढण्यासाठी होणारी गर्दी बघता पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकावर युटीएस अ‍ॅपद्वारे तिकीट काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून या सुविधा सुरळित चालण्यासाठी कुठल्याही उपाययोजना करण्यात येत नसून चक्क या क्यू आर कोडवर अनधिकृत जाहिराती लावण्यात येत आहेत. क्यू आर कोडच एकप्रकारे अनधिकृत जाहिरातींनी हॅक केल्यामुळे ऑनलाईन तिकीट काढणारे प्रवासी त्रस्त आहेत.त्यामुळे पश्चिम रेल्वे प्रशासनाने अनधिकृतपणे जाहिराती लावणार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे.

रेल्वेच्या परिसरात अनधिकृत जाहिराती या नवीन नाहीत.काही दिवस रेल्वे प्रशासनाने याबाबत कठोर पाऊल उचलले देखील होते.परंतु,या कारवाईत सातत्य नसल्याने पुन्हा एकदा या अवैध जाहिरातबाजांनी आपले डोके वर काढले आहे.हे जाहिरातबाज कोणत्याही जागेचे महत्व न बघता बिनदिक्कत जाहिरात लावून जात असतात.आता तर त्यांनी क्यू आर कोड देखील सोडलेले नाहीत. परंतु, अनधिकृत जाहिराती लावण्यात येत असताना देखील रेल्वे प्रशासन निद्राअवस्थेत असून संबंधित जाहिरातींवर संपर्क क्रमांक दिला जात असताना देखील रेल्वे प्रशासनाकडून यावर कारवाई केली जात नाही.विशेष म्हणजे क्यू आर कोडवरील या जाहिराती काढण्याची तसदी देखील स्टेशन प्रशासनाने घेतलेली नाही.

 

“सकाळी तिकीट काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अशा वेळी क्यू आर कोड स्कॅन करून तिकीट काढणे अतिशय सोपे होते. मात्र मागील कित्येक महिन्यांपासून ही यंत्रणा बंद असल्याने मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ही यंत्रणा तातडीने सुरू करावी. अशाप्रकारे जाहिराती लावणार्‍यांवर देखील कारवाई करावी”

– संदीप शिंदे, एक त्रस्त प्रवासी

 

 

First Published on: November 23, 2022 9:09 PM
Exit mobile version