सदानंद महाराज आश्रमाच्या जागेचा तिढा सुटणार

सदानंद महाराज आश्रमाच्या जागेचा तिढा सुटणार

वसईः वसईजवळील तुंगारेश्वर पर्वतावरील ६९ गुंठे जमीन बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रमास देण्याचा सकारात्मक विचार सरकार करील असे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर प्रदेशाचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या शिष्टमंडळास दिले. यावेळी आश्रमाचे सचिव केदारनाथ म्हात्रे आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर उपस्थित होते. वन संरक्षण कायदा, १९८० आणि वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये संरक्षित जमीन देण्यासाठी राज्य सरकारचे ‘ना हरकत पत्र’ लागते. हे प्रकरण महाराष्ट्र सरकारकडे तीन वर्षे अनिर्णीत असल्यामुळे त्याबद्दलचा सकारात्मक निर्णय लवकर करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वनमंत्री, संबंधित प्रकरण हाताळणारे उच्चाधिकारी, तसेच आश्रमाचे तीन प्रतिनिधी, स्वतः राम नाईक आणि या प्रकरणी माहिती अधिकार कायद्याखाली चार अर्ज केलेले विशेषज्ञ अनिल गलगली यांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी राम नाईक यांनी यावेळी केली. त्याप्रमाणे बैठक बोलावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

६९ गुंठे जमीन आश्रमास देण्यात यावी. भाविकांना आश्रमात जाण्यासाठी असलेला प्रतिबंध हटवण्यात यावा. तुंगारेश्वर अभयारण्यात अस्तित्त्वात असलेल्या सातिवली ते बॉक्साईट खाणीपर्यंतचा ७.८० किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी. परशुराम कुंड आणि तुंगारेश्वर महादेव मंदिराला ‘क’ तीर्थस्थळाचा दर्जा २००५ मध्ये देण्यात आला असून गेल्या १७ वर्षात सरकारने कोणतीही विकासाची कामे केली नाहीत तीही पूर्ण करण्यात यावीत, अशा मागण्या सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्य सरकारकडे केली आहे. मुख्यमंत्री यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून संयुक्त बैठकीद्वारे आश्रमाचे आणि भाविक जनतेचे प्रश्न सुटतील असा विश्वास राम नाईक यांनी व्यक्त करून मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले. राम नाईक यांची दोन गाजलेली पुस्तके ‘चरैवेति! चरैवेति!!’ आणि ‘कर्मयोद्धा राम नाईक’ यावेळी मुख्यमंत्र्यांना राम नाईक यांनी दिली.

First Published on: October 24, 2022 7:55 PM
Exit mobile version