ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामांची विक्री

ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामांची विक्री

जिल्हा परिषदेच्या ३०५४ शिर्षकातील मार्ग व पूल योजनेतून नऊशे मीटर लांबीच्या ४१ लाख रुपयांच्या रस्त्याच्या कामाची निविदा मंजूर झाल्यानंतर ते काम दुस-याच ठेकेदाराला विकण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. त्याकामाचे निरीक्षण आणि एमबी रेकॉर्डिंग करणारे शाखा अभियंता आणि उपअभियंता यांनी प्रत्यक्ष कम करणाऱ्या ठेकेदाराला निविदाधारकाचा भागीदार असल्याचे गृहीत धरले आहे. मात्र, भागिदारीची नोंदणीची कागदपत्रे नसतानाही शाखा अभियंता आणि उपअभियंता यांनी दुस-याच ठेकेदाराने बेकायदेशीरपणे केलेल्या कामाचे अंतिम बिल काढून दिले आहे. जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती काशीनाथ चौधरी यांनी या कामाचा दर्जा आणि निविदा विक्रीचा प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

साखरे आणि नावझे या दोन गावांना जोडणारा जोडरस्ता आणि त्यात छोटे मोरी बनवण्याचा ४१ लाख २२ हजार रुपयांचा ठेका चेतन धानमेहेर यांना मंजूर झाला होता. मात्र, प्रत्यक्षात ते काम अरुण अधिकारी या ठेकेदाराने केल्याचे उजेडात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे कामाचा दर्जा चांगला नसल्याने पहिल्या पावसाच्या पाण्यातच रस्त्या लगतचा माती भराव वाहून डांबरीकरण उखडले आहे. तसेच रस्ताही उखडला गेला आहे.

निविदाधारक ठेकेदाराने आपले काम अन्य ठेकेदाराला विक्री करणे अथवा काम करण्यास देऊ शकत नाही. निविदा लागलेल्या ठेकेदारानेच ते काम दर्जात्मक पद्धतीने करणे अपेक्षित आहे.
– चंद्रकांत वाघमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर

साखरे येथील डोंगरी भागात प्रकाश पाटील यांच्या शेतात माती भरावा पावसामुळे वाहून जमा झाला आहे. पावसाचे पाणी वाहण्यासाठी रस्त्याखाली मोरी प्रस्तावित होती. तसे अंदाजपत्रकातही नमूद करण्यात आले होते. पण, ग्रामस्थांच्या विरोधामुळे मोरी अन्यत्र टाकल्याचे प्रत्यक्ष काम करणारे ठेकेदार अरुण अधिकारी यांनी दै.आपलं महानगरशी बोलताना सांगितले. अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार जर मोरी अन्यत्र टाकली आहे, तर तशी लेखी परवानगी वरिष्ठ कार्यालयाकडून घेणे बंधनकारक होते. पण नियोजित मोरी अन्यत्र टाकून काम उरकून निविदाधारकाला मार्च २०२१ लाच बिल देण्याची घाई शाखा अभियंता डी. बी. दमाणे, प्रभारी उपअभियंता हेमंत भोईर,तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांनी केल्याचे उजेडात आले आहे.

निविदधारक चेतन धानमेहेर हे चिंचणी येथील असल्याने ३०५४ च्या शिर्षकातील हे काम अरुण अधिकारी यांनी केल्याची बाब समोर आल्याने शाखा अभियंता आणि प्रभारी उपअभियंता हेमंत भोईर यांनी त्यांची बाजू घेत ते निविदाधारकाचे भागीदार असल्याचे सांगितले. पण धानमेहेर यांनी प्रत्यक्षात त्यांचे पार्टनरशिप डिड अथवा कोणतेही संमतीपत्र दिले नसल्याचे दै.आपलं महानगरला माहिती देताना सांगितले. निविदा ज्याला मंजूर झाली आहे, ते काम त्याच ठेकेदाराने करणे अपेक्षित आहे. असें बांधकाम विभागातील अभियंत्यांने सांगितले. पण जिल्हा परिषदेत अशी कामे सर्रासपणे होत असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा –

एकाच महिलेला तीन वेळेस डोस दिल्याचा आरोप

First Published on: June 30, 2021 12:06 AM
Exit mobile version