सरावली ग्रामपंचाय सदस्यांचा राजीनाम्याचा इशारा

सरावली ग्रामपंचाय सदस्यांचा राजीनाम्याचा इशारा

बोईसर विभागातील श्रीमंत असलेल्या सरावली ग्रामपंचायतींच्या १७ सदस्यांनी शाखा अभियंत्यांच्या त्रासाला कंटाळून सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा पालघर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना गुरुवारी भेटून दिला. शाखा अभियंता एस. आर. जाधव यांच्या ग्रामपंचायतीच्या विकासकामांमधे वाढत्या हस्तक्षेपमुळे त्यांची बदली अन्यत्र करण्यात यावी या मागणीसाठी सतरा सदस्यांनी शिवसेनेचे पालघर जिल्हा समन्वयक प्रभाकर राऊळ यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी चंद्रशेखर जगताप यांना भेटून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. तसेच शाखा अभियंत्यावर कारवाई न झाल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा इशाराही दिला आहे.

सरावली ग्रामपंचायतीत विकासकामांना चालना दिल्यानंतर कोणत्या ठेकेदाराने काम करायचे हे अप्रत्यक्षरीत्या शाखा अभियंता जाधव ठरवत असल्याचा आरोप करीत सरपंच, उपसरपंचासह १७ सदस्य आक्रमक झाले आहेत. कार्यक्षेत्रातील विकासकामांच्या निविदा लागलेल्या ठेकेदारांना काम योग्य होत नसल्याचे कारण देत शाखा अभियंता जाधव त्रास देत असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. एका विशिष्ठ ठेकेदाराने काम केल्यास त्यांच्या कामात त्यांना कोणतीही अडचण भासत नसून दर्जाहीन कामाकडे डोळेझाक केली जात असल्याचां आरोप सरपंच लक्ष्मी जनार्दन चांदणे यांनी केला आहे.

ग्रामपंचायतीच्या कारभारात हस्तक्षेपाबाबत जाधव यांच्याविरोधात करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येईल. तथ्य आढळल्यास कारवाई करण्यासाठी वरिष्ठांना अवगत करण्यात येईल. शिवाय बदलीबाबतच्या तक्रारीची सूचना उपअभियंता कार्यालयाला देण्यात आली आहे.
– चंद्रशेखर जगताप, गटविकास अधिकारी, पालघर

या शाखा अभियंत्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर अनेक ठेकेदारांनी उपअभियंता कार्यालयात तोंडी तक्रार केली आहे. ग्रामविकास अधिकारी सुभाष किणी यांनी गेल्या तीन वर्षात ग्रामपंचायत निधीने कोट्यवधींची विकास कामे निविदा पद्धतीने राबवली आहेत. मात्र कामे मर्जितल्या विशिष्ठ ठेकेदाराला मिळण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शाखा अभियंत्याच्या मनमानी कारभारामुळे विकासकामांमध्ये दर्जा राखणे मुश्किल होत आहे. विशिष्ठ ठेकेदार असेल तरच काम दर्जात्मक होत असल्याचा जाधव यांचा हट्टाहास निविदेतील कामात भागीदारी असल्याचा संशय बळावत आहे, असा आरोप उपसरपंच अशोक साळुंखे यांनी केला आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारात अभियंताचा होणारा हस्तक्षेप त्यामुळे चिंतेचा विषय बनला आहे. त्यातून अभियंता विरुद्ध लोकप्रतिनिधी असा संषर्घ निर्माण झाला आहे.

शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या सरावली ग्रामपंचायती जाधव यांच्या मनमाना कारभाराची तक्रार केल्यानंतर गटविकास अधिकारी चंद्रशेखर जगताप आणि प्रभारी उपअभियंता हेमंत भोईर यांनी चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. शिवाय जाधव यांच्या कार्यक्षेत्राचा बिट बदलीबाबत वरिष्ठ कार्यालयाशी सल्लामसलत करून तातडीने कारवाई करण्यात येईल, असे हेमंत भोईर यांनी सांगितले.

हेही वाचा –

पालकांनो मुलांची काळजी घ्या !

First Published on: May 21, 2021 3:44 PM
Exit mobile version