रुग्णालयाशेजारी घनकचरा व्यवस्थापन केंद्र

रुग्णालयाशेजारी घनकचरा व्यवस्थापन केंद्र

पालघर : एडवण ग्रामपंचायतीने आरोग्यवर्धिनी केंद्रालगत कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन केंद्राची जागा निश्चित करून त्याचे भूमिपूजनही उरकून घेतले आहे. रुग्णालयाच्या परिसरातच 30 ते 35 घरे आहेत त्यामुळे रुग्णालयात येणार्‍या रुग्णांना व तिथे राहणार्‍या ग्रामस्थांना व दररोज या मार्गाने प्रवास करणार्‍या प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागणार आहे. या केंद्रामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत असून ही जागा बदलून दुसर्‍या ठिकाणी हे केंद्र करावे अशी मागणी स्थानिकांनी करून यास विरोध दर्शविला आहे. रस्त्यालगत घनकचरा व्यवस्थापन केंद्र तयार करण्यात येणार आहे. त्याच्या अगदी समोर येथील आरोग्य केंद्र आहे. त्या आरोग्य केंद्रात मथाने कोरे डोंगरे दातीवरे माकुणसार खारडी व आजूबाजूच्या परिसरातील असंख्य रुग्ण औषध उपचारासाठी येत असतात त्यामुळे रुग्णांना रुग्णालयातील कर्मचार्‍यांना दररोज दुर्गंधीचा सामना करावा लागणार आहे यामुळे रोगराई वाढण्याची भीती व्यक्त होत असून घाण माश्यांचा प्रादुर्भाव सुद्धा वाढणार आहे. ग्रामपंचायतीने या केंद्राची जागा निश्चित करताना कोणता निकष लावला हे मात्र गुलदस्त्यातच आहे.राहत्या वस्तीमध्ये डम्पिंग ग्राउंड करायचे असते का असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
डम्पिंगला लागूनच आपत्ती निवारण केंद्रासाठी असलेली राखीव जागा आहे.

किनारपट्टी लगत बिकट परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना तिथे आणून ठेवण्यासाठी निवारा केंद्राची जागा प्रस्तावित आहे. अगदी या जागेला लागूनच हे केंद्र ग्रामपंचायत उभारत आहे. त्याच्या शेजारी तलाव आहे पावसाळ्यामध्ये डम्पिंगचे घाण पाणी या तलावात जाणार आहे. त्याचप्रमाणे रस्त्याच्या बाजूला होत असलेला डम्पिंग हे उतरणीवर असल्याने तेच घाण पाणी रुग्णालयाचा आवरात सुद्धा जाण्याची शक्यता आहे. त्या संपूर्ण परिसरात लोक बागायती व शेती करत आहेत. तलावाच्या पाण्यामुळे तिथे असलेल्या विंधन विहिरीच्या पातळीमध्ये वाढ होत आहे. ते घाण पाणी तलावात गेल्यामुळे बोरवेल द्वारे हे पाणी लोकांच्या शेतात जाणार आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न सुद्धा निर्माण होणार आहे. याकरिता तिथे राहत असलेल्या ग्रामस्थांनी सह्याची मोहीमा आखली असून त्याद्वारे त्यांनी ग्रामपंचायतीस पत्र देवून विरोध दर्शविला आहे.घनकचरा व्यवस्थापनाच्या केंद्राच्या बाजूलाच सरकारी रुग्णालय आहे. आजूबाजूस घरे आहेत. त्यामुळे आरोग्याशी निगडित अनेक प्रश्न निर्माण होण्याचा धोका उद्भवू शकतो. ग्रामस्थांना विश्वासात न घेता हे सर्व करण्यात आले आहे. ते चुकीचे आहे. या केंद्राला आमचा विरोध आहे. – विकास राऊत, ग्रामस्थ

गावातील कचरा तिथे आल्यावर त्याचे विघटन करण्यात येणार आहे. त्यामुळे तिथल्या रुग्णालयाला व इतरांना त्याचा त्रास होणार नाही.
-राजेंद्र वैती,
सरपंच, एडवण ग्रामपंचायत

First Published on: February 20, 2023 9:39 PM
Exit mobile version