डहाणू कुटीर रुग्णालयाच्या क्षमता वाढीच्या प्रस्तावाला स्ट्रक्चरल ऑडिटचा अडथळा

डहाणू कुटीर रुग्णालयाच्या क्षमता वाढीच्या प्रस्तावाला स्ट्रक्चरल ऑडिटचा अडथळा

डहाणू : डहाणू कुटीर रुग्णालयाच्या जुन्या इमारतीचे संरचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) साठी विशेष निधी उपलब्ध होत नसल्याने डहाणूच्या प्रस्तावित २०० बेडच्या क्षमतेच्या इमारतीचे काम तीन वर्षापासून रखडले आहे. एकीकडे शासनाकडे जिल्हा प्रशासनाची इमारत बांधण्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च झाला असताना डहाणू रुग्णालयाच्या बांधकामासाठी संरचनात्मक परिक्षणासाठी निधी दिला जात नसल्याचे नागरिक नाराज आहेत. डहाणू येथे २०० बेडचे कुटीर रुग्णालयाचे काम हाती घेण्याचे निर्देश दोन वर्षापूर्वी आरोग्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले असतानाही त्यात प्रगती नसल्याने डहाणूकरांना आरोग्यसेवेसाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे.

डहाणू तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी डहाणू कुटीर रुग्णालय हे आरोग्यविषयक बाबींसाठी एकमेव आधार केंद्र आहे. या कुटीर रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम १९५४ साली झाले असून या वास्तूला ६८ वर्ष झाली आहेत. डहाणू कुटीर रुग्णालयात २०० खाटांची क्षमतेची इमारत, रक्तपेढी उपलब्ध करणे, शस्त्रक्रीया करणे, सोनोग्राफी, सिटीस्कॅनची व्यवस्था तातडीने उपलब्ध करुण देण्याचे आश्वासन राज्याचे तत्कालीन आरोग्य मंत्र्यांनी आमदार विनोद निकोले यांना दिले होते. मात्र त्यानंतरही येथील आरोग्य व स्थिती दयनीय स्थिती आहे. डहाणू येथे २०० बेडचे अद्यायावत रुग्णालय बांधण्यासाठी आरोग्यमंत्र्यांना मागणी केली. या मागणीस तत्कालीन आरोग्यमंत्रींनी प्रशासनानाला निर्देश दिले. मात्र जुन्या इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिट साठी शासनाकडे निधी नसल्याचे कारण सांगण्यात आले. मात्र प्रशानसाच्या उदासिन धोरणामुळे रुग्णालयाची क्षमता वाढवण्याचा मार्ग रखडून राहीला आहे. स्ट्रक्चर ऑडीटसाठी निधी नसल्याने हा प्रस्ताव अडकल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. हा अडथळा दूर करण्यासाठी कुटीर रुग्णालयाच्या इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी आमदार निधीतून पैसे देणार असल्याचे डहाणू विधान सभेचे आमदार कॉ. विनोद निकोले यांनी बोलताना सांगितले.

डहाणू कुटीर रुग्णालयात वैद्यकीय सुविधा पुरेशा प्रमाणात नाहीत. सरकारकडून या भागातील आरोग्य संस्थांसाठी कोट्यवधीचा निधी पुरवला जातो. मात्र डहाणू येथे मोठ्या आजारावर उपचार मिळत नसल्याने त्यांना गुजरात किंवा सेलवास आणि मुंबई येथे रुग्णालयात हलविण्यासाठी सल्ला दिला जातो. उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्याने गरीब आदिवासी रुग्ण उपचार घेऊ शकत नाहीत. डहाणू आणि तलासरी तालुके आदिवासी बहुल आहेत. सरकारी आरोग्य केंद्र आणि रुग्णालयावर ते अवलंबून आहेत. त्यामुळे डहाणू येथे अद्ययावत रुग्णालय बांधण्याची मागणी नागरिक करीत आहेत. मात्र पाठपुरावा अभावी अनेक वर्षापासून ही मागणी प्रलंबित आहे.

First Published on: October 24, 2022 7:59 PM
Exit mobile version