तब्बल तीन दिवस अर्धवट जळालेला मृतदेह स्मशानभूमीत

तब्बल तीन दिवस अर्धवट जळालेला मृतदेह स्मशानभूमीत

मृतदेह

भाईंदर पश्चिमेच्या शनिवारी रात्री महापालिकेच्या स्मशानभूमीत गॅस दाहिनीत अंत्यविधी सुरु असताना अचानकपणे चक्क गॅस संपला. त्यामुळे अर्धवट अवस्थेत जळालेल्या मृतदेहावर तब्बल तीन दिवसानंतर मंगळवारी अंत्यविधी पूर्ण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास भाईंदर पश्विम येथील स्मशानभूमीतील गॅस दाहिनीत अंत्यविधी सुरु असताना अचानक बंद पडली. तेथील कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता दाहिनीतील गॅस संपल्याचे दिसून आले. गॅस संपल्याने दाहिनी बंद पडून मृतदेह अर्धवट अवस्थेत जळाला होता. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे दाहिनीमधील गॅस पुन्हा भरण्याकरता महापालिका प्रशासनाला तब्बल तीन दिवसांचा कालावधी लागला. त्यामुळे तीन दिवसानंतर त्या मृतदेहावर अंत्यविधी पार पाडण्यात आला. इतके दिवस केवळ सुविधेअभावी अशा पद्धतीने मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत पडून राहिल्याने स्मशानभूमीत अंत्यसंस्काराठी जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत होते. कोट्यावधी रुपये खर्च करून देखील स्मशानभूमीत सुविधांचा अभाव असल्याने शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

स्मशान भूमीतील दाहिनी सुरु ठेवण्याकरता प्रशासनाकडून कंत्राट देण्यात आले आहे. मात्र या कामाची निविदा संपल्यामुळे त्या दिवशी गॅसची कमतरता निर्माण झाली होती. आता दाहिनीमध्ये गॅस भरण्यात आले असून यांनतर स्मशानभूमीत पाईपलाईनद्वारे गॅस सोडण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात गॅस कमी पडल्याची घटना घडणार नाही.
– दीपक खांबित, कार्यकारी अभियंता

मीरा भाईंदर महापालिका प्रशासनाकडून शहरात चार ठिकाणी गॅस दाहिनीची निर्मिती करण्यात आली आहे. या मीरा रोड, काशीमिरा व भाईंदर आणि बंदरवाडी परिसरात या दाहिन्या आहेत. या दाहिन्या एलपीजी गॅसमार्फत सुरु ठेवण्यात आल्या आहेत. महापालिका प्रशासनाने त्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक केलेली आहे. गेल्या दीड वर्षात कोरोना आजाराने थैमान घातल्याने मृत शरीरावर गॅस दाहिनीमार्फत अंत्यविधी पार पाडण्यात येत आहेत.

जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे. महापालिकेने करोडो रुपये खर्च करून अंत्यसंस्कार करण्यासाठी वाहिन्या बनवल्या आहेत. मात्र गॅस पुरवठा सुरळीत नसल्याने अशाप्रकारे मृतदेहाला मोक्ष मिळताना देहाची विटंबना होईल, असे कोणतेही काम महापालिकेने काम करू नये. याकडे आयुक्तांनी स्वतः लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी. तसेच पुन्हा अशी घटना घडणार नाही याची काळजी घ्यावी.
– रोहित सुवर्णा, सामाजिक कार्यकर्ते

(इरबा कोनापुरे – हे भाईंदरचे वार्ताहर आहेत.)

हेही वाचा –

गहू, हरभऱ्याचा हमीभाव वाढवण्याचा केंद्राचा निर्णय, नवीन MSP काय ?

First Published on: September 8, 2021 7:26 PM
Exit mobile version