कडूचीवाडी रस्त्यावरचा पूल गेला वाहून

कडूचीवाडी रस्त्यावरचा पूल गेला वाहून

मध्य वैतरणाला जोडणाऱ्या कडूचीवाडी-कोचाळे रस्त्यावरील मोरी खचली होती. त्यावर संबंधित विभागाने खचलेल्या बाजूने दगड लावले होते. परंतु पाऊस पडल्याने तो रस्ता पूर्णपणेच वाहून गेला आहे. त्यामुळे कडूचीवाडी आणि मध्य वैतरणाकडे जाणारा रस्ताच बंद झाला आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभाग मोखाडा यांच्याकडे कडूचीवाडी रस्ता होता. परंतु त्या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून केले असल्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभाग एमजीएसवायकडे बोट दाखवत आहे. त्यांनीच त्या पुलाचे काम करावे असे बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. पण, रस्ता बनवण्याकडे दोन्हीही विभाग हात झटकताना दिसतात.

अनेकवेळा कडूचीवाडी मोरीबद्दल प्रशासनाला लेखी पत्र देऊन कळवण्यात आले होते. परंतु दोन वर्षं झाली तरी याबाबत गंभीरपणे लक्ष दिले जात नाही. आता रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी,रेशनिंग धान्य वाहतूक,रुग्ण वाहतूक पूर्ण बंद झाली आहे. या पुलासाठी निधी मंजूर झाला असून देखील काम सुरु न केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे.
– प्रदीप वाघ, पंचायत समिती सदस्य, मोखाडा

कडूचीवाडी-कोचाळे हा मध्य वैतरणा जलाशयाकडे जाणारा अतिशय महत्वाचा रस्ता असून त्या रस्त्यावरची मोरी पावसामध्ये वाहून गेली आहे. या आधीच प्रशासनाने लक्ष दिले असते तर कडूचीवाडी-कोचाळे आणि इतर गावांची रस्त्यामुळे ये-जा थांबली नसती. रस्ता पूर्ण तुटल्यामुळे गावांशी संपर्क होऊ शकत नाही आणि तेथील लोकांना बाजारासाठी खोडाळा येथे जाताही येत नाही. याच रस्त्यावरून स्वस्त धान्य दुकान, रॉकेल, आरोग्य सेवा, किराणा या सगळ्या आवश्यक गरजांची वाहतूक होत असते. तसेच मुंबई महापालिकेला मध्य वैतारणाकडे जाणारा हाच मार्ग आहे. तोच मार्ग सध्या बंद पडल्याने गावकऱ्यांसह महापालिकेचीही गैरसोय होऊ लागली आहे.

हेही वाचा –

तानसा मार्गावरील धोकादायक पुलावरून हजारो प्रवाशांची ये-जा; शहापुरातील २५ गावांचा प्रवास

First Published on: August 16, 2021 8:01 PM
Exit mobile version