वाद टोकाला गेला,सैरभर झालेल्या त्याने प्रेयसीचा शेवट केला

वाद टोकाला गेला,सैरभर झालेल्या त्याने प्रेयसीचा शेवट केला

वाणगाव : गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेले प्रेमप्रकरण प्रेयसीने अचानक तोडल्याने सैरभैर झालेल्या प्रियकराने तिचा जीव घेऊन स्वतःही आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती उजेडात आल्याने बोईसर येथील हत्याकांडावर प्रकाश पडण्यास सुरुवात झाली आहे. बोईसरच्या टीमा रुग्णालयासमोर बुधवारी दुपारी कृष्णा यादव (वय २६ वर्षे) या तरुणाने स्वतःकडील देशी कट्ट्याने प्रेयसी नेहा महतो (वय २१ वर्षे) या तरुणीच्या डोक्यात गोळी झाडून तिची निर्घृण हत्या केली.तारापूर औद्योगिक वसाहतीमधील पॅरामाउंट या कंपनीत काम करणारा कृष्णा यादव हा मूळचा उत्तर प्रदेशातील जौंनपुर जिल्ह्यातील असून तो बोईसरजवळील कोलवडे या गावात आपल्या इतर कामगार सहकार्‍यांसोबत भाड्याच्या खोलीत राहत होता. तर स्नेहा महतो ही तरुणी मूळची बिहारच्या छप्रा जिल्ह्यातील असून ती आपल्या आई वडिलांसह सरावली येथे राहत होती. कृष्णा यादव आणि तरुणीचे वडील दिनेशकुमार महतो हे एकाच कंपनीत काम करीत होते. त्यातूनच कृष्णा यादव आणि स्नेहा महतो यांची ओळख होऊन त्याचे प्रेमात रूपांतर झाले होते. मागील पाच वर्षे त्यांचे हे प्रेमप्रकरण सुरू होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून दोघांत भांडण सुरू होते. स्नेहाने लग्नाला नकार देत त्याच्यापासून फारकत घेतली होती.

कृष्णा यादव याने बुधवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास स्नेहा महतोला जेएसडब्लू मियावाकी पार्कजवळ भेटायला बोलावले होते. त्याठिकाणी फोटो काढत असताना पुन्हा त्यांच्यात वाद सुरू झाल्याने नेहा निघून जाऊ लागली असताना तिच्या मागोमाग आलेल्या कृष्णा यादवने टीमा रुग्णालयाच्या समोरच स्वतःकडील देशी कट्ट्याने मागून तिच्या डोक्यात गोळी झाडली. यामुळे नेहा खाली कोसळून तिचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळापासून अवघ्या ५० फुटांवर खैरापाडा बीट पोलीस चौकी असून गोळीबारानंतर लोकांचा आरडाओरडा एकूण धावत आलेल्या पोलिसांनी तरूणीला टीमा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. गोळीबाराच्या घटनेनंतर संपूर्ण पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली असून मयत तरुणीचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मुंबईतील जे.जे.रुग्णालयात पाठवण्यात आला. तर माथेफिरू तरुणाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह स्विकारण्यास कुटुंबिय न आल्याने मृतदेह वसई येथील शवागरात ठेवण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर पोलीस या गोळीबार घटनेचा तपास करीत असून माथेफिरू कृष्णा यादवकडे देशी कट्टा जिवंत काडतुसे नेमकी कुठून आली याचा बोईसर पोलीस शोध घेत आहेत.

स्वतःच्या डोक्यात देखील गोळी झाडण्याचा प्रयत्न

कृष्णा याने स्वतःच्या डोक्यात देखील गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कट्टा लॉक झाल्याने त्याचा हा प्रयत्न फसला. त्यानंतर धावत पळत त्याने खैरापाडा उड्डाणपूल सर्कलजवळ विराज कंपनीच्या धावत्या ट्रकसमोर जीव द्यायचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने तिथे ही तो सुदैवाने वाचला. पुढे धावत जात त्याने डी डेकॉर कंपनीच्या समोर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ट्रकखाली उडी मारली. यात ट्रकचा मागच्या चाकाखाली सापडून तो गंभीर जखमी झाला होता. तिथे पोचलेल्या बोईसर पोलिसांनी त्याच्याकडील देशी कट्टा हस्तगत करीत रुग्णवाहिकेतून तातडीने जवळच्या टीमा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

 

First Published on: September 29, 2022 8:54 PM
Exit mobile version