सफाळ्यात वणवा सत्र सुरूच; तांदूळवाडी घाट, नावझेतील जंगलाला आग

सफाळ्यात वणवा सत्र सुरूच; तांदूळवाडी घाट, नावझेतील जंगलाला आग

पालघर तालुक्यातील सफाळेसह साखरे, नावझे, गिराळे डोंगरावर गेल्या दहा दिवसांपासून वणवा लावण्याच्या घटना घडत आहेत. हा वणवा चंद्राच्या आकाराचा गोलाकार लावला जात असून चारी बाजूने आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी वन कर्मचाऱ्यांना शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत. सफाळे परिसरातील वणवे हे चंद्राच्या आकाराने गोल दिसत असल्याने ही आग जाणीवपूर्वक लावली जात असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसापूर्वी दिवसाढवळ्या गिराळे-नगावे येथील एका आदिवासी गरिब कुटुंबाचे वणव्यात घरासह सामान जळून खाक झाले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री तांदूळवाडी घाटात तर शनिवारी नावझे येथे डोंगराला वणवा लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे या वणव्यात वनसंपत्ती धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.

जंगलात लावलेले वणवे हे आमच्या कर्मचाऱ्यांडकडून विझवण्यात येत आहेत. वणवे लावणाऱ्यांचा शोध आम्ही घेत असून लवकरच त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
– नम्रता हिरे, वनक्षेत्रपाल, सफाळे व दहिसर

यातील ७० ते ८० टक्के वणवे मानवनिर्मित असून जंगलातील प्राणी, पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हजारो प्रकारची दुर्मिळ झाडे, प्राणी व पक्षी या जंगलात आहेत. मात्र जंगलातील वणवे पेटविण्याच्या संख्येत वाढ होत चालल्याने वन संपत्ती धोक्यात आली आहे. येथील रान गवत, कारवी, साग, खैर, पळस आणि छोटी मोठी झाडे तर अनेक प्राणी पक्षी व सर्प जाती या वणव्यात नष्ट होत आहेत. जंगलाचे वणव्यापासून संरक्षण करण्यासाठी वन विभागामार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडत असून दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या वृक्ष लागवड संकल्प फोल ठरत आहे. तसेच हे वणवे शिकाऱ्याकडून ससे, रान डुक्कर आदी वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी जाणीवपूर्वक लावले जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र, शिकारी शिकार करून निघून जातात. तर अशावेळी रात्री गस्तीवर असलेले वनअधिकारी मात्र जंगलात जाण्याचे धाडस करत नाही. त्यामुळे आतापर्यंत कोणावरही कारवाई झालेली दिसत नाही.

हेही वाचा –

ही राक्षसी हुकूमशाहीची नांदी; उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावरील कारवाईवर संजय राऊत संतापले

First Published on: March 22, 2022 8:53 PM
Exit mobile version