शासन म्हणते,खर्च केले 17 कोटी, नागरिकांना मिळतेय रोजी -रोटी

शासन म्हणते,खर्च केले 17 कोटी, नागरिकांना मिळतेय रोजी -रोटी

जव्हार : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन 2022 ते सन 2023 साठी निश्चित केलेल्या 14 लाख 53 हजार 568 मनुष्य दिन निर्मिती उद्दिष्टांपैकी आतापर्यंत 7 लाख 107 मनुष्य दिन उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. त्यासाठी 17 कोटी 22 लाख 47 हजार एवढा निधी खर्च करण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अधिकारी राणी आखाडे यांनी दिली.शाश्वत रोजगार या माध्यमातून मजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊन 87 हजार मनुष्य दिन निर्मिती झाले आहे. तर 17 कोटी 22 लाख 47 हजार रुपये निधी हा खर्च झाला आहे.
जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागात मजुरी करून कुटुंब सांभाळणे अशीच एकंदरीत परिस्थिती आहे, या भागात शासनाच्या अनेक योजना प्रभावीपणे सुरू आहेत. यामध्ये एक आदर्श योजना म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या भागातील नागरिकांना जीवन जगण्यासाठी एक महत्त्वाचे साधन बनले आहे. खरिपाच्या हंगामात शेती करून कामे आटोपली की, येथील आदिवासी रोजगाराचे शोधात आपापल्या कुटुंबासहित शहराकडे स्थलांतर करीत असतात. निवार्‍याची वेळेवर पोटभर जेवणाची व झोपण्याची पुरेशी व्यवस्था मिळत नसल्याने नागरिकांचे आरोग्य ढासाळते. कुटुंबांत लहान बालके असतील तर त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहून कुपोषणाला सुरुवात होत असते. या सगळ्या गोष्टींचा पूर्वइतिहास बघता राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाल्याने या सगळ्या गोष्टींवर मात व्हायला काहीशी मदत होत असते.

या योजनेतून नागरिकांच्या दैनंदिन जीवन मान उंचावण्याकरिता त्यांची दैनंदिन शैली विकसित होऊन त्यातून एक चांगले आरोग्य निर्माण व्हावे, याकरिता शोषखड्डे निर्माण करणे जेणेकरून पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही अशा दृष्टीने ही कामे केली जात आहेत. शिवाय सिंचन विहीर जनावरांचे गोठ,े कुक्कुटपालन शेड शेळी पालन शेड इत्यादी प्रकारच्या माध्यमातून रोजगार वाढवून आर्थिक उन्नती होण्यासाठी भर पडणार आहे. शेतकर्‍यांना आपापल्या जागेत फळझाडे लागवड करण्यासाठी रोजगार हमीच्या माध्यमातून उद्दिष्ट ठेवण्यात आल्याने फळझाडांना लागलेल्या फळातून नागरिकांना घरच्या घरी पौष्टिक असा समतोल आहार मिळण्यास मदत होईल, शिवाय फळे विकून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाल्याने स्थलांतर थांबेल.

बॉक्स

या योजनेंतर्गत 1 एप्रिल ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीत आतापर्यंत 17 कोटी 22 लाख 47 हजार एवढा निधी खर्च करण्यात आला असून आतापर्यंत 7 लाख 107 मनुष्य दिन उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पाऊस कमी होताच पूर्ण केले जाईल, अशी माहिती राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे अधिकारी राणी आखाडे यांनी दिली.

First Published on: September 25, 2022 10:29 PM
Exit mobile version