बेपत्ता झालेल्या वसईतील रामचंद्र दास यांचे गूढ उकलेले

बेपत्ता झालेल्या वसईतील रामचंद्र दास यांचे गूढ उकलेले

सौजन्य - पीटीआय

वसई विरार महापालिकेच्या वरुण कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या रामचंद्र दास यांचा अखेर शोध लागला. वरुणमध्ये उपचार घेत असताना त्यांना २६ एप्रिलच्या मध्यरात्री तुळींज रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्याठिकाणी २७ एप्रिलच्या पहाटे त्यांचे निधन झाले. पण, त्यांच्या नातलगांचा ठावठिकाणा नसल्याने आणि कोरोना असल्याने दास यांच्या मृतदेहावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार उरकून टाकले. पोलिसांनी या घटनेचा माग काढत दास यांच्या बेपत्ता होण्यामागील गूढ उकलून काढले.

दास प्रकरणानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रामचंद्र दास (८२) यांना कोरोनाची लागण झाल्याने २२ एप्रिल रोजी रात्री ७.४५ वाजता उपचारासाठी महापालिकेच्या वरूण इंडस्ट्रीज येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या उपचाराचे १४ दिवस ५ मे रोजी पूर्ण झाल्यामुळे त्यांना घरी आणण्यासाठी नातेवाईक कोविड सेंटरमध्ये गेले असता रामचंद्र दास सेंटरमध्ये नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर वसईत एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर बुधवारी याप्रकरणी कोविड सेंटरमधील डॉ. विनय सालपुरे यांनी रामचंद्र दास बेपत्ता झाल्याची तक्रार वालीव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

सीसीटीव्ही फुटेजमधून दास यांना वरुणमधून तुळींज रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती समोर आली. दास यांच्या नातलगांची माहिती नसल्याने, कोविडमुळे मृत्यू झाल्याने प्रशासनाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणाची चौकशी सुरु आहे.
– सतीश लोखंडे, प्रभारी आयुक्त

महापालिकेने याप्रकरणाची चौकशी सुरु केली असतानाच पोलिसांनीही चौकशी सुरु केली. पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी दिवसभर कोविड सेंटरमध्ये तपासणीचे काम केले. यावेळी पोलिसांनी सेंटरमधील २२ एप्रिलपासूनचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच रजिस्ट्ररचीही तपासणी केली. त्याचबरोबर डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी, सुरक्षारक्षक आणि काही रुग्णांचेही जबाब नोंदवण्याचे काम केले. सीसीटीव्ही फुटेजमधून दास यांचा ठावठिकाणा समोर आला.

२६ एप्रिलच्या मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास दास यांची प्रकृत्ती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी महापालिकेच्या तुळींज येथील रुग्णालयात नेण्यात आले होते. त्याठिकाणी त्यांचे २७ एप्रिलच्या पहाटे निधन झाले. दास यांना वरुणमध्ये दाखल करताना सविस्तर माहिती घेतली न गेल्याने तुळींज रुग्णालय प्रशासन नातेवाईकांपर्यंत पोचू शकले नाहीत. दास यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने त्यांचा मृतेदह ठेवता येत नसल्याने प्रशासनाने बेवारस म्हणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले होते. पोलिसांच्या तपासातून दास यांच्या बेपत्ता होण्याचे गूढ उकलले गेले.

कोविड सेंटरमधून रुग्ण बेपत्ता झाल्याची तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. तेव्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात येत असल्याचे दिसून आले. त्यानंतर केलेल्या चौकशीत दास यांना तुळींज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणीच त्यांचा मृत्यू झाला होता हे दिसून आले.
– विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव

दरम्यान, या घटनेनंतर वसई विरार महापालिकेच्या आरोग्य खात्यातील भोंगळ कारभाराचा नमुना समोर आला आहे. वरुण कोविड सेंटरमधून रुग्ण दुसऱ्या ठिकाणी हलवताना महापालिकेच्या आरोग्य विभागाने ट्रान्सफर पेपरच तयार केलेले नव्हते. तसेच तुळींज रुग्णालयातही रुग्ण आणणल्याची नोंद करण्याचे राहून गेल्याची माहिती हाती लागली आहे.

हेही वाचा – 

लसीकरणाच्या जबाबदारीपासून राज्य सरकार पळ काढतंय, दरेकरांचा आरोप

First Published on: May 12, 2021 10:55 PM
Exit mobile version