पावसाच्या हजेरीने शेतकरी सुखावला

पावसाच्या हजेरीने शेतकरी सुखावला

वसईः अनेक दिवस पावसाने दडी मारल्याने भातशेती पाण्यावाचून कोरडीठाक झाली होती. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र, दीड दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे.गेल्या महिन्यात पावसाने अनेक दिवसा दडी मारली होती. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला होता. गणेशोत्सवात पावसाने पाठ फिरवल्याने भाविकांना घरोघरी जाऊन दर्शन घेणे सुलभ झाले होते. मात्र दीड दिवसांच्या बाप्पांच्या विसर्जनानंतर पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतीला दिलासा मिळाला आहे. आणखी काही दिवस पाऊस झाला नसता तर पिके कुजण्याचा धोका होता. गेल्या काही दिवसात पाऊस मुसळधार कोसळल्याने भातशेतीला आधार झाला आहे.

बुधवारपासून पावसाने विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाटाने आकाश व्यापले आहे. शेवटी शुक्रवारी पावसाने मुसळधार हजेरी लावलीच. सप्टेंबर महिना हा पावसाचा शेवटचा महिना असे ऋतूमानानुसार ठरलेले असले तरी गेल्या दोन-तीन वर्षात पर्जन्यमानाचे चक्र बिघडले आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस लांबतो. यात अवकाळीमुळे शेतीचे नुकसान होते. यंदा पाऊस उशिरा झाल्याने भातशेती लांबली. त्यामुळे भात लागवडीचा हंगाम लांबला आहे. हंगाम लांबल्याने भातकापणीदेखील उशिराच होईल, असा अंदाज शेतकर्‍यांनी वर्तवला आहे. पुढील दोन-तीन दिवस गणेशोत्सवावर पावसाचे विघ्न असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

First Published on: September 6, 2022 6:21 PM
Exit mobile version