आधारभूत खरेदी योजने अंतर्गत धानाची विक्री प्रक्रिया सुरू

आधारभूत खरेदी योजने अंतर्गत धानाची विक्री प्रक्रिया सुरू

जव्हार : आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत धानाची विक्री करण्यासासाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यावर्षीपासून पहिल्यांदाच ऑनलाईन नोंदणीदरम्यान शेतकर्‍यांना प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागेल. 3 ते 4 सेकंदाचा व्हिडिओ काढून तो ऑनलाईन नोंदणी अर्जासोबत अपलोड केल्यानंतरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यामुळे व्यापार्‍यांच्या बोगस धान विक्रीवर फार मोठे नियंत्रण येणार आहे. जव्हार तालुक्यात शेतकर्‍यांसाठी आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत आदिवासी विकास महामंडळ कार्यालय जव्हार यांच्यावतीने धानाची विक्री प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, जव्हार,मोखाडा, कासा शहापूर, व मनोर येथील कार्यालयात यंदा धान खरेदीची नोंदणी करिता लाईव्ह व्हिडिओ आवश्यक असणार आहे. कार्यालयीन स्तरावरून शेतकर्‍यांना धानाची विक्री प्रक्रिया ऑनलाईन असल्याने वेळेत करण्याचे आवाहन आदिवासी विकास महामंडळ या कार्यालयातून करण्यात आले आहे.

शेतकर्‍यांच्या सातबार्‍यावर व्यापारी मोठ्या प्रमाणात धान विकत असल्याची ओरड नेहमीच होत होती. हा प्रकार टाळण्यासाठी शासनाने आता कठोर पावले उचलली आहेत. शेतकर्‍याचा लाईव्ह व्हिडिओ आधारभूत खरेदी केंद्रावर नोंदणीच्या वेळी अपलोड करावा लागणार आहे. त्यासाठी शेतकर्‍याला प्रत्यक्ष आपल्या सातबारासह उपस्थित राहावे लागणार आहे. लाईव्ह व्हिडिओ अपलोड न केल्यास नोंदणीची प्रक्रियाच पूर्ण होणार नाही. धान विक्री करते वेळीसुद्धा शेतकर्‍याला प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागणार आहे. त्यावेळीसुद्धा त्याचा व्हिडिओ काढला जाणार आहे. पूर्वी व्यापारी शेतकर्‍यांचे सातबारे गोळा करून ते संबंधित संस्थेकडे सोपवत होते. दोघांचीही मिलीभगत राहत असल्याने व्यापार्‍यांचेच धान्य सर्वप्रथम विकले जात होते.

First Published on: October 11, 2022 10:07 PM
Exit mobile version