ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या कामाला मुहूर्त सापडेना

ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या कामाला मुहूर्त सापडेना

बोईसर: भाडे तत्वावर घेतलेली बोईसर ग्रामीण रुग्णालयाची इमारत अतिशय धोकादायक बनल्याने दोन वर्षांपासून हे रुग्णालय टिमा रुग्णालयाच्या इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरुपात स्थलांरीत करण्यात आले आहे.३० खाटांच्या नवीन रुगालयाच्या इमारतीसाठी जागा आरक्षित करून देखील आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्याने परिसरातील गरीब रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. ३० खाटांच्या बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी सरावली ग्रामपंचायत हद्दीतील महसूल विभागाची १.५ एकर शासकीय जागा आरक्षित करण्यात आली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इमारतीचा आराखडा आणि कामाचे अंदाजपत्रक देखील सादर करण्यात आले आहे.मात्र दोन वर्षांपासून इमारतीच्या बांधकामासाठी अपेक्षित असेलला २२ कोटींचा निधी मिळत नसल्याने बोईसर आणि परीसरातील गरीब नागरिकांना आणखी काही वर्षे मोफत आणि चांगल्या उपचारांसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

तारापूर औद्योगिक वसाहत आणि आजूबाजूच्या ५० गावातील जवळपास २ लाख नागरिक व्यापार,रोजगार,शिक्षण आणि आरोग्य सुविधांसाठी बोईसर शहरावर अवलंबून आहेत.बोईसर शहरात ५० हून अधिक खाजगी दवाखाने आणि अद्ययावत रुग्णालये उपलब्ध आहेत.मात्र या रुग्णालयातील महागडे उपचार गरीब रूग्णांच्या आवाक्याबाहेरचे असल्याने त्यांना नाईलाजाने मुंबई,ठाणे अथवा गुजरात आणि सिल्वासा येथील शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत.बोईसर येथे २००६ साली ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी मिळालेली होती.रुग्णालयाच्या इमारतींसाठी शासकीय जागा उपलब्ध नसल्याने हे रुग्णालय नवापूर नाका येथील एका खाजगी इमारतीत भाडेतत्वावर सुरू होते.मात्र २०२० साली ही इमारत देखील अतिशय धोकादायक बनल्याने रुग्णालय सरावली जि.प.शाळा,त्यानंतर दांडी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आत्ता टिमा रुग्णालयाच्या इमारतीत रडतखडत सुरू आहे.या ठिकाणी बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी रोज २०० ते २५० रुग्ण येत असतात.त्यातच मंजूर पदांपैकी १५ पदे रिक्त असल्याने अपुर्‍या मनुष्यबळाच्या आधारावर रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत.

First Published on: March 9, 2023 8:48 PM
Exit mobile version