जिल्ह्यात वेठबिगारी नाही; पोलीस अधिक्षकांचा दावा

जिल्ह्यात वेठबिगारी नाही; पोलीस अधिक्षकांचा दावा

मोखाडा तालुक्यातील आसे गावातीलएका शेतमजूराने वेठबिगाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास सुरु आहे. पण, प्राथमिक माहितीत जिल्ह्यात वेठबिगारी किंवा इतर अनिष्ट प्रकार नसल्याचा दावा पालघर जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी केला आहे. मोखाडा येथील काळू धर्मा पवार (वय ४८) यांनी १३ जुलै रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांची पत्नी सावित्री पवार यांनी २० ऑगस्टला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यात पतीने वेठबिगारीला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप केला होता. त्यावरून मोखाडा पोलीस ठाण्यात गावातील शेतकरी रामदास कोरडेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या संवेदनशिल घटनेची दखल घेऊन पालघर पोलीस अधिक्षक दत्तात्रेय शिंदे, जव्हारच्या उपविभागीय अधिकारी आयुशी सिंग व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी आसे या दुर्गम गावाला भेट दिली. त्यांनी मृताची पत्नी, मुली, नातेवाईक, गावकरी, ग्रामसेवक, सरपंच व इतर संबंधितांची भेट घेतली. त्यानंतर मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून शिंदे यांनी पवार यांच्या आत्महत्येमागे वेठबिगारीचे कारण नाही. तसेच जिल्ह्यात वेठबिगारी किंवा इतर अनिष्ट पद्धती नसल्याचा शिंदे यांचा दावा आहे.

काळू पवार यांनी १३ जुलैला धर्मा यांनी घरी आत्महत्या केली होती. याघटनेनंतर कुटुंबिय किंवा गावकऱ्यांनी याबाबत पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही. प्रचंड पाऊस कोसळत असल्याने गावातच खड्डा खोदून प्रेत दफन करून अंत्यविधी करण्यात आला होता. तसेच २ ऑगस्ट रोजी या आत्महत्येविषयी मोखाडा पोलिसांना प्रथम माहिती प्राप्त झाली असता मृताच्या पत्नीने कोणत्याही प्रकारचा संशय व्यक्त केला नसल्याचे पोलीस अधिक्षकांनी यांनी स्पष्ट केले. १२ जुलैला काळू पवार घरी उशिरा आले तेव्हा दारुच्या नशेत होते. त्यानंतर ते तसेच झोपी गेले होते. काळू पवार यांना दारू पिण्याचे व्यसन होते. रामदास कोरडे यांच्याकडे ते रोजंदारीवर काम करीत असत. त्याबदल्यात कोरडे त्यांना पैसेही देत होते. कोरडे यांची बिअर शापी असल्याने काळू पवार यांना दारू पिण्यासाठी मिळत होती, अशी माहिती गावात भेट दिल्यानंतर समोर आल्याचेही शिंदे यांचे म्हणणे आहे.

सध्या भाताच्या आवणीचा काळ सुरू असून मोखाडा परिसरात मजुरांची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवत आहे. आगामी काळात आपल्याकडे कामाला यावे म्हणून शेतकरी ग्रामीण भागातील समूहांना शेती हंगाम सुरू होण्यापूर्वीच भेटीगाठी घेऊन घेत असल्याची माहिती पाहणी दरम्यान पुढे आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

मृताच्या या दोन्ही मुलींना आश्रमशाळेमध्ये चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळेल यासाठी जव्हारच्या आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांनी कार्यवाही सुरू केली असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. आपल्या प्रत्यक्ष भेटीदरम्यान जिल्ह्यात कोणताही अनिष्ट प्रकार सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिंदे यांच्या भेटीदरम्यान उपविभागीय अधिकारी प्रशांत परदेशी, तहसिलदार वैभव पवार, तलाठी, सरपंच, ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांची सभा घेण्यात आली होती. त्यात गावकऱ्यांनी वेठबिगारी नसल्याचा सांगितल्याचेही शिंदे यांचे म्हणणे आहे. दरम्यान, वेठबिगारी किंवा कोणताही अनिष्ट प्रकार जिल्ह्यात सुरू असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात, पोलीस नियंत्रण कक्ष, पालघर पोलिसांचे संकेतस्थळावर किंवा स्वतः पोलीस अधीक्षक यांना थेट संपर्क साधून तक्रार दाखल करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले आहे.

हेही वाचा –

म्हाडा मुंबई मंडळाकडे विक्रमी अधिमुल्य महसूल जमा – गृहनिर्माण मंत्री आव्हाड

First Published on: August 25, 2021 8:34 PM
Exit mobile version