कारखान्यातील स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू

कारखान्यातील स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू

वसई : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात बुधवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटात ३ कामगारांचा मृत्यू झाला असून १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. येथील कारखान्यांमध्ये स्फोटाची मालिका सुरुच असून गेल्या चार वर्षात झालेल्या स्फोटात तीसहून अधिक कामगारांचा मृत्यू झाला आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट क्र.डी-१७ वरील भगेरीया इंडस्ट्रीज लिमिटेड या रासायनिक कारखान्यात बुधवारी संध्याकाळी ४.३० वाजताच्या सुमारास जोरदार स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की यामध्ये २ कामगार जागीच ठार झाले. तर १३ कामगार भाजल्याने त्यांना उपचारासाठी बोईसरमधील शिंदे रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान आणखी एका कामगाराचा मृत्यू झाला.

भगेरीया इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत कापड उद्योगात डाईंगसाठी आवश्यक गामा अ‍ॅसिडचे उत्पादन सुरू करण्यात आले होते. यामध्ये उत्पादन प्रक्रिया सुरू असताना बुधवारी संध्याकाळी ४.३० वाजता तापमान आणि दाब क्षमतेपेक्षा अधिक वाढल्याने रिअ‍ॅक्टरमध्ये स्फोट झाला. स्फोटाच्यावेळी उत्पादन विभागात जवळपास १८ कामगार काम करीत होते. यामधील गोपाल गुलजारीलाल शीसोदीया (२७ वर्षे) आणि पंकज यादव (३२ वर्षे) या दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर १३ जखमी कामागारांना बोईसरमधील शिंदे रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना सिकंदर कुमार गोस्वामी (४० वर्षे) या आणखी एक कामगाराचा मृत्यू झाला. स्फोट झाल्यावर उत्पादन सुरू असलेले अ‍ॅसिड शरीरावर उडाल्याने कामगार गंभीररीत्या भाजून जखमी झाले आहेत.

जखमी कामगारांची नावे…
१) मुकेश चेनू दास, वय ३३ वर्षे २) श्रवण मुरारी दास, वय ३३ वर्षे,३)हिमांशू प्रमोद पाठक, वय ३० वर्षे,४) घनश्याम रामप्यारे निषाद, वय ४५ वर्षे,५) देवेंद्र कुबेर यादव, वय २२ वर्षे,६) अरुण ओमप्रकाश पटेल, वय २७ वर्षे,७) राजू कुंजीलाल पासवान, वय ४० वर्षे,८) हंसराज लालधारी यादव, वय ४० वर्षे,९) नारायण श्रीकिशोर मिश्रा, वय २४ वर्षे,१०) सुनील हिरा, वय ३१ वर्षे,११) भवानी रामसजीवन सिंग, वय १९ वर्षे १२) श्रीराम मनिलाल मेहता, वय १८ वर्षे

चार वर्षांत तीसहून अधिक कामगारांनी गमावला जीव
तारापूर औद्योगिक वसाहतीत अपघातांची मालिका सुरूच असून कारखान्यांचे मालक,संचालक व व्यवस्थापन,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ,औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय,कामगार विभाग यांचे दुर्लक्ष, ढिसाळ कारभाराने या अपघाती घटना घडत आहेत.
ठेका पद्धतीवर काम करणारे अप्रशिक्षीत कामगार,जुनाट यंत्रसामुग्री, परवानगी नसलेल्या मालाचे उत्पादन,अग्निसुरक्षा कार्यान्वित नसणे,कारखान्याच्या अंतर्गत आणि आवारात केलेले अनधिकृत बांधकाम,उत्पादनांच्या रासायनिक प्रक्रियेदरम्यान ठरवलेल्या सुरक्षा मानांकांचे पालन न करणे इत्यादी कारणांमुळे २०१८ पासून मागील ४ वर्षात नोवा फेम,यूपीएल,रामदेव केमिकल्स,साळवी केमिकल्स,आरती ड्रग्ज, स्क्वेअर केमिकल्स,करिगो ऑर्गनिक्स,एसएनए हेल्थकेयर, गॅलक्सी सरफॅक्टनंट,एएनके फार्मा,नांदोलीया केमिकल्स, जखारीया फॅब्रिक्स,बजाज हेल्थ केयर अशा जवळपास डझनभर कारखान्यात स्फोट,आग आणि वायुगळतीच्या गंभीर अपघाती घटना घडल्या असून किरकोळ अपघाती घटना तर सहज दडपून टाकल्या जात आहेत. यामध्ये जवळपास ३० ते ३५ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १०० च्या वर कामगार गंभीर जखमी होऊन यामध्ये काहींना कायमचे अपंगत्व आले आहे.

एखाद्या कारखान्यात अपघाताची घटना घडली की अधिकारी आणि राजकीय नेते अपघातस्थळी भेट देऊन त्याठिकाणची पाहणी करतात व दोषीवर कठोर कारवाई करून पिडितांना न्याय मिळवून देण्याची वारेमाप आश्वासने देऊन जातात. परंतु पुन्हा एकदा ये रे माझ्या मागल्याप्रमाणे तारापूरमध्ये अपघातांची मालिका सुरूच असून बळी गेलेल्या आणि कायमचे अपंगत्व आलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना तुटपुंजी नुकसानभरपाई देऊन बोळवण केली जाते. औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचे मालक,संचालक व व्यवस्थापन,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ,औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय,कामगार विभाग यांच्या ढिसाळ कारभाराने सातत्याने होत असलेल्या अपघाती घटनांवर आतापर्यंत नियंत्रण मिळवणे शक्य झालेले नाही. औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमध्ये सातत्याने होत असलेले स्फोट,आग,वायुगळती आणि इतर अपघाती घटनांमुळे पालघर बोईसरचा संपूर्ण परिसरच ज्वालामुखीच्या तोंडावर उभा आहे. या अपघाती घटना थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना न आखल्यास एक दिवस तारापूर बोईसरसह आजूबाजूच्या १० ते १५ किमी परिसराची राखरांगोळी होण्याची भीती व्यक्त होत आहे.

First Published on: October 27, 2022 9:24 PM
Exit mobile version