पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना यंदा लवकर होणार गणवेश वाटप !

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना यंदा लवकर होणार गणवेश वाटप !

भाईंदर :- मीरा-भाईंदर पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर विलंबाने गणवेश वाटप केले जात होते. मात्र यंदा शाळा सुरू जूनपासून होणार आहे. त्यानंतर आठवड्याभरातच पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करता येतील. यादृष्टीने खरेदीसाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांना दिले आहेत. त्यामुळे यावर्षी विलंबाने गणवेश वाटपाची परंपरा खंडित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्यावर्षी कोरोना महामारीच्या दोन वर्षानंतर शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेश वाटप होणे अपेक्षित होते. परंतु विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेश दिले नसल्यामुळे पालकांनी व विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. २०२२ – २३ ह्या शैक्षणिक वर्षापासून पालिकेने शाळांचा गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम हाती घेतले होते. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे गणवेश व जेवण देण्याचे प्रशासनाकडून निश्चित करण्यात आले आहे. यासह गणवेश दरवर्षी प्रमाणे विद्यार्थ्यांना विलंबाने मिळून येत होते. यासाठी देखील विशेष खबरदारी घेतली जात आहे.

पालिकेच्या नुकताच पार पडलेल्या शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांच्या बैठकीत विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी नाही, तर किमान पहिल्या आठवड्यात गणवेश मिळावेत या दृष्टीने खरेदीसाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी असे निर्देश आयुक्त दिलीप ढोले यांच्याकडून विभागांना देण्यात आले. मीरा-भाईंदर मनपा शाळेत शहरातील गरीब व गरजू विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने त्यांना गणवेश, दप्तर, वह्या-पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य मोफत दिले जाते.

First Published on: March 12, 2023 9:07 PM
Exit mobile version