अवकाळी पावसामुळे आंब्याच्या मोहराला फटका

अवकाळी पावसामुळे आंब्याच्या मोहराला फटका

गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस यामुळे मोखाडा तालुक्यातील खोडाळा परिसरातील आंब्याच्या मोहराला फटका बसला असून मोहोर ढगाळ वातावरणामुळे व अचानक कोसळलेल्या पावसामुळे सडून जाण्याच्या मार्गावर आहे. यंदा पावसाळी हंगामातील परतीच्या पावसाचा कालावधी वाढल्याने आंबा पिकांवर परिणाम होऊन आंब्यांची मोहर प्रक्रिया लांबली गेली. त्यातही लांबलेल्या मोहरा प्रक्रियेत नुकताच फुलायला सुरुवात झालेल्या आंब्याचा मोहराचा ढगाळ वातावरणामुळे व अवकाळी पावसाने झोडपल्याने आंबा करपला आहे. दरवर्षी निसर्गाचा वाढत चालेला लहरीपणा, तसेच लांबत असलेला पाऊस, त्यामुळे वातावणात होणारा बदल याचा परिणाम हंगामी पिकांवर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. साधारणपणे सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाला सुरुवात होते. मात्र या वर्षी पावसाने नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत पाऊस पडतच होता. आता दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाने हजरी लावल्याने आंब्याच्या मोहराचे नुकसान झाले आहे.

साधारणतः नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात थंडीला सुरुवात होऊन आंबा पिकाला मोहर येण्यास सुरुवात होत असते. मात्र, या वर्षी नोव्हेंबरमध्ये पाहिजे तेवढी थंडी न पडल्यामुळे आंब्याच्या झाडांना उशिराने मोहर येण्याची प्रक्रिया सुरू झाली. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसाने पालघर जिल्ह्यासह तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. सलग दोन-तीन दिवसांपासून हवामान बदलाने कहर केला असून काही ठिकाणी ढगाळ तर काही ठिकाणी धुक्याची झालर पांघरून दिवसभर वातावरण ढगाळलेले असल्यामुळे आंब्याच्या मोहरावर परिणाम होऊन रिमझिम पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे नुकत्याच झाडाला उमललेल्या मोहराच्या अंकुरांना जोरदार फटका बसल्यामुळे आंब्याचे नुकसान झाले आहे.

साधारणपणे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याच्या कालावधीत आंब्याच्या झाडांना मोहोर फुलण्यास सुरुवात होते. मोहराला पोषक अशी थंडीचे वातावरण लाभल्यास मोहर भरगच्च येतो. डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका जास्त असतो. परिणामी या महिन्यात आंबा चांगला फुलतो. परंतु ऐनवेळी फुलण्याच्या वेळेला हवामानात झालेल्या बदलांमुळे आंब्याच्या मोहराचे नुकसान झाल्याने आंबा करपला आहे. या वातावरणामुळे आंब्याला आलेला मोहर पावसामुळे गळायला सुरुवात झाली असून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. यामुळे काही भागात आंब्याचा मोहर गळालेल्या अवस्थेत दिसत आहे. तर काही ठिकाणी काळपट पडला आहे. त्यामुळे आंब्याच्या गोडव्याला घरघर लागली आहे.

हेही वाचा –

Property tax exemption : मुंबईतील ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करमाफी, राज्य

First Published on: January 12, 2022 8:27 PM
Exit mobile version