१८ डिसेंबर रोजी होणार मतदान, वाड्यात आचार संहिता लागू

१८ डिसेंबर रोजी होणार मतदान, वाड्यात आचार संहिता लागू

वाडा : नोव्हेंबरमध्ये मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने बुधवारी (दि.९) जाहीर केला.वाडा तालुक्यात १४ ग्रामपंचायतींवर जनतेतून थेट सरपंचाची निवडणूक होणार आहे.त्यामुळे गुलाबी थंडीत तालुक्यातील राजकीय वातावरण तापणार आहे.निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने ग्रामीण भागातील राजकारण आता ढवळून निघणार आहे. राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक ही महत्त्वपूर्ण मानली जाते.याच निवडणुकीत वरून पंचायत समिती ,जिल्हा परिषद निवडणुकांची रणनीती ठरविली जाते.पंधराव्या वित्त आयोगामूळे ग्रामपंचायतींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होत असल्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामविकासाला चालना मिळत आहे.ग्रामपंचायतीची निवडणुक ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या निवडणूक चिन्हावर लढविली जात नाही.सर्वच राजकीय पक्ष पॅनल तयार करून अप्रत्यक्षपणे ही निवडणूक लढवतात. बुधवारी निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने गुलाबी थंडीत वाड्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.

आचार संहिता लागू

निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचार संहिता लागू राहील.या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकार्‍यांना आचार संहितेच्या कालावधीत कुठेही करता येणार नाही. शासनाने सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे तालुक्यात होणार्‍या १४ ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचाची थेट जनतेतून निवड केली जाणार आहे.त्यामुळे या निवडणुकांमध्ये चांगलीच चुरस दिसून येणार आहे.

 

First Published on: November 10, 2022 8:29 PM
Exit mobile version