वसई-विरारमधील पाणी प्रश्न गढूळ कोणामुळे ?

वसई-विरारमधील पाणी प्रश्न गढूळ कोणामुळे ?

वसई : वसई -विरार महापालिका पुरेसा पाणीसाठा उपलब्ध करून देत असल्याची बतावणी करत असली तरी गेल्या काही दिवसांपासून अनियमित आणि अपुर्‍या पाणीपुरवठयामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याचा फायदा घेत टँकर माफियांनी लुटमार सुरु केली असून एका टँकरसाठी किमान अडीच ते तीन हजार रुपये उकळले जात असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यासाठी पाण्याचा ऑडिट रिपोर्ट जाहीर करण्याची मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट यांनी केली आहे. महापालिकेकडून नागरिकांना त्यांचा हक्काचे पाणी मिळत नसल्याच्या गंभीर तक्रारीनंतर पालघरचे तत्कालीन पालकमंत्री दादासाहेब भुसे यांनी महापालिका आयुक्तांना १७ नोव्हेंबर २०२१ रोजी पाण्याचे ऑडिट करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बारोट यांनी पाण्याचे ऑडिट झाले असेल तर ऑडिट रिपोर्ट सार्वजनिक करा, अशी मागणी अनेकवेळा केली आहे. मात्र, तो अहवाल सार्वजनिक न केल्याने महापालिका प्रशासनाच्या कार्यपध्दतीवरच नागरिकांच्या मनात शंका निर्माण झाल्याचा त्यांचा आरोप आहे.

महापालिकेकडे पुरेसा पाणीसाठा असूनही गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक पाण्यासाठी वणवण करत आहेत. वसई -विरार परिसरात टँकर माफिया, आरओ प्लांट यांचा धंदा तेजीत आहे. असंख्य कार वॉशिंग सेंटरमध्ये हजारो वाहने धुतली जात आहेत. त्याचप्रमाणें बेकायदेशीर व कायदेशीर इमारती उभ्या केल्या जात आहेत. असे अनेक धंदे आहेत ज्यामध्ये दररोज हजारो लाखो लिटर पाण्याचा पुरवठा होत आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी त्रस्त असलेला सर्वसामान्य नागरीक या सर्व ठिकाणी मुबलक पाणी येते कोठून असा प्रश्न विचारू लागले आहेत. नागरिकांमध्ये असलेली चर्चा आणि शंका दूर करण्यासाठी सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. यासोबतच पाण्याचे ऑडिट सार्वजनिक करण्याची मागणीही बारोट यांनी केली आहे.

First Published on: February 20, 2023 9:35 PM
Exit mobile version