पिंपळे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ महापालिकेत काम बंद आंदोलन

पिंपळे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ महापालिकेत काम बंद आंदोलन

ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी वसई विरार महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. यावेळी मुख्यालयाबाहेर निदर्शने करून आयुक्त आणि पोलिसांना निवेदन देण्यात आले. वसई विरार महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात वसई विरार परिसरातील मोठ्या प्रमाणात असलेले फेरीवाले आणि अनधिकृत बांधकामामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे महापालिका आयुक्त आणि पोलीस प्रशासनाचेही लक्ष वेधले आहे. महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाले आहेत. त्याचबरोबर अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे आहेत. त्यांच्यावर प्रभाग समितीनिहाय वेळोवेळी कारवाई करण्यात येते.

अनेकदा पुरेशा पोलीस बंदोबस्ताअभावी अपुऱ्या मनुष्यबळासह जीवाची जोखीम स्विकारून अधिकारी-कर्मचारी कारवाई करतात. फेरीवाले आणि अनधिकृत बांधकामधारकांच्या मुजोरीमुळे वसई विरार महापालिकेच्या अधिकारी-कर्मचा-यांवर वारंवर जीवघेणे हल्ले यापूर्वीही झाले आहेत. याकडे आंदोलनाच्या निमित्ताने लक्ष वेधण्यात आले आहे. नालासोपारा पूर्वेकडील रेहमत नगरमधील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यात मधुकर डोंगरे हे कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. पण, याप्रकरणी गंभीर कारवाई न झाल्यामुळे असे प्रकार वारंवार घडत आहेत. अशाप्रकारच्या कृत्यांमुळे महापालिका हद्दीतील अनधिकृत फेरीवाले व अनधिकृत बांधकामधारकांची मुजोरी वाढली असून अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होऊन त्याचा प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असल्याची तक्रार आयुक्त गंगाथरन डी. आणि पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची भेट घेऊन करण्यात आली.

ठाण्यासारखी दुर्दैवी घटना वसईत घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुरक्षारक्षक, अंगरक्षक द्यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त संतोष देहेरकर, आशिष पाटील, उपायुक्त किशोर गवस, नयना ससाणे, शंकर खंदारे, तानाजी नरळे, पंकज पाटील, चारुशीला पंडित, अजिंक्य बगाडे, दिपक कुरळेकर, विजयकुमार द्वासे, कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्तांच्यावतीने महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा – 

राजू शेट्टींना विधान परिषदेवर नियुक्त करण्यात अडचण?, अजित पवारांनी केलं

First Published on: September 2, 2021 8:06 PM
Exit mobile version