जळगावात तणाव : दौरा सुरू होण्यापूर्वीच फाडले आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर

जळगावात तणाव : दौरा सुरू होण्यापूर्वीच फाडले आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर

जळगाव : शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने आज जळगाव जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. पण या दौऱ्यापूर्वीच काल मध्यरात्री धरणगावातील प्रवेश मार्गावर लावण्यात आलेले त्यांच्या स्वागताचे बॅनर अज्ञात व्यक्तींनी फाडल्याचे समोर आले. त्यामुळे जळगावात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

दहीहंडीच्या निमित्ताने काल शिवसेनेतील दोन्ही गटांतील दरी वाढल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले. ठाण्यातील टेंभीनाका येथील दहीकाला उत्सवाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या बंडखोरीचे समर्थन करताना आम्ही 50 थर लावून सर्वात मोठी दहीहंडी फोडली. सर्वांच्या आशीर्वादाने हे सरकार अस्तित्वात आले, असे म्हणाले होते. त्याला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले. तुम्ही 50 थर लावले की थरकाप झाला आहे, हे सर्वांना माहीत आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यानी केली होती.

या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांची जळगाव जिल्ह्यात शिवसंवाद यात्रा होणार आहे. विशेष म्हणजे, तेथील मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह किशोर पाटील आणि चिमण आबा पाटील शिंदे गटातील या तीन आमदारांच्या मतदारसंघातही आदित्य ठाकरे दौरा करणार आहेत. पाचोरा, धरणगाव, पारोळा, मालेगावमध्ये आदित्य ठाकरे हे शिवसैनिकाशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे जळगावात ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत.

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात असलेल्या धरणगावातील शिवसंवाद यात्रेदरम्यान शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकजवळ त्यांची सभा होणार आहे. आदित्य ठाकरे यांची ही शिवसंवाद यात्रा धरणगावात ज्या मार्गाने प्रवेश करणार आहे. त्या मार्गावरील बॅनर फाडल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. यामुळे काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी याची लगेच दखल घेऊन हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावरून शिंदे गटातील आमदार किशोर पाटील यांनी टीका केली आहे. आमदार म्हणून मी त्यांचे स्वागतच करतो. परंतु त्यांनी हे आधीच केले असते तर, अशी वेळ आली नसती, असा टोला त्यांनी लगावला. पण त्याचबरोबर शिंदे गटात असलो तरी, आजही माझ्या मनात ठाकरे कायम आहेत, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

First Published on: August 20, 2022 11:51 AM
Exit mobile version