पोलिसांवर दबाव असल्याचा अजित पवारांचा आरोप अस्वस्थतेतून, बावनकुळेंचा पलटवार

पोलिसांवर दबाव असल्याचा अजित पवारांचा आरोप अस्वस्थतेतून, बावनकुळेंचा पलटवार

मुंबई : सत्ताधारी पक्षाचा पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. मात्र, सत्ता गेल्यामुळे अजित पवार अस्वस्थ असून विरोधी पक्षनेते असल्याचे दाखविण्यासाठी ते काही तरी आरोप करत आहेत, असा पलटवार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केला.

राज्यात सत्तांतर होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार आल्यापासून सत्ताधाऱ्यांचा राज्य आणि पोलीस प्रशासनावर प्रचंड दबाव आहे. या दबावामुळे पोलीस प्रशासन आणि सचिव तणावात आहेत, असा दावा अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केला. ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर राज्याचे चित्र गंभीर व्हायला वेळ लागणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. या आरोपाचा बावनकुळे यांनी समाचार घेतला.

राज्याचे गृहमंत्रिपद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. ते कधीही सत्तेचा दुरुपयोग करत नाहीत. त्यांच्या कार्यकाळात राज्य सरकारने गुंडाराज संपविले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मात्र बलात्काऱ्याला संरक्षण देण्यात आले. गृहमंत्र्याला तुरुंगात जावे लागले, मंत्र्यांच्या बगलबच्च्यांना पोलीस सुरक्षा दिली. राज्यातील पोलिसांचे खच्चीकरण करण्यात आले. चांगल्या अधिकाऱ्यांना बाजूला केले. यामुळे अजित पवार यांना बोलण्याचा काही अधिकार नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेशिवाय राहू शकत नाही. सत्ता गेल्यानंतर त्या पक्षात अस्वस्थता आहे. सत्तेसाठी अजित पवार यांनी केलेली खेळी योग्य होती की, शरद पवार यांची चाल बरोबर होती, यावरून त्या पक्षात संघर्ष चालू आहे. महाविकास आघाडीमध्येही अस्वस्थता आहे. त्या पक्षातील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. अशा अस्वस्थतेतून अजित पवार माध्यमांमध्ये जागा मिळविण्यासाठी आरोप करत आहेत, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.

लव्ह जिहादमध्ये हिंदू मुलींना पद्धतशीर फसविण्यात येते. लव्ह जिहाद रोखण्यासाठी सरकारने कडक कायदा करावा, असे मतही चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडले.

हेही वाचा – या सगळ्या राजकारणात ‘शकुनी’ कोण? जितेंद्र आव्हाडांचा सवाल

First Published on: November 15, 2022 7:50 PM
Exit mobile version