देशमुखांचा भाजप प्रवेश युवा कार्यकर्त्यांना आवडणार नाही; संभाजी पाटील निलंगेकर

देशमुखांचा भाजप प्रवेश युवा कार्यकर्त्यांना आवडणार नाही; संभाजी पाटील निलंगेकर

आमदार अमित देशमुख

लातूरः काॅंग्रेसचे आमदार अमित देशमुख यांचा भाजप प्रवेश माझ्या युवा कार्यकर्त्यांना आवडणार नाही, असे भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे देशमुख यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर पडदा पडला आहे.

लातूर येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना संभाजी पाटील निलंगेकर यांनी काॅंग्रेसचे आमदार अमित देशमुश व धीरज देशमुख यांच्या भाजप प्रवेशावर भाष्य केले.  ते म्हणाले, देशमुख भाजपात येणार नाहीत व त्यांना आम्ही घेत नाही. देशमुख भाजपत आलेले माझ्या युवा कार्यकर्त्यांना आवडणार नाही. देशमुख हे लातूरचे प्रिन्स राजकुमार आहेत. सतत सत्तेत राहावे, अशी त्यांची इच्छा आहे. असे असले तरी जनतेचे प्रश्न कधीच देशमुख यांनी मांडले नाहीत.

आगामी महापालिका निवडणुकीमध्ये भाजप तरुणांना संधी देणार आहे. त्यामुळे ३५ वर्षांच्या आतील कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारी करावी. ८० टक्के जागांवर युवकांना संधी दिली जाणार आहे, असे आमदार संभाजी पाटील निलंगेकर  यांनी युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा लातूर जिल्हा काॅंग्रेसचा बालेकिल्ला आहे. विलासराव देशमुख हे काॅंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. सोनिया गांधी यांच्या अगदी विश्वासाताील नेते म्हणून विलासराव देशमुख यांची ख्याती होती. म्हणूनच काॅंग्रेसची सत्ता असताना दोनवेळा विलासराव देशमुख यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. त्यांच्यानंतर अमित देशमुख हे राजकारणात सक्रिय झाले. त्यांनाही नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. ते निवडून आले व त्यांना मंत्रिपदही मिळाले.

गेल्या काही दिवसांपासून अमित देशमुख हे नाराज असल्याची चर्चा होती. ते भाजपमध्ये जाणार असेही बोलले जात होते.  अभिनेता रितेश देशमुख यांच्या मागेही चौकशीचा ससेमिरा सुरु झाला आहे. त्यामुळे काॅंग्रेसला धक्का देत अमित देशमुख व धीरज देशमुख हे नक्कीच भाजपत जातील, असे दावे सुरु होते. भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सर्व चर्चा व दाव्यांना पूर्णविराम दिला आहे.

First Published on: January 12, 2023 9:33 AM
Exit mobile version