अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याचे काम लवकरच, राज्य शासन उद्या देणार आदेश – सोमय्या

अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याचे काम लवकरच, राज्य शासन उद्या देणार आदेश – सोमय्या

मुंबई : दापोलीतील अनिल परब यांचे रिसॉर्ट लवकरच पाडण्यात येणार असून राज्य सरकार उद्या रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देणार आहेत, अशी माहिती भाजपाचे ज्येष्ठ नेते किरटी सोमय्या यांनी दिली.
किरीट सोमय्या यांनी मागील महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख नेत्यांविरोधात जोरदार आघाडी उघडली होती. त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरण समोर आणली होती. त्यानंतर माजी मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग आणि संजय पांडे यांना अटक झाली. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेते व माजी परिवहनमंत्री अनिल परब यांना लक्ष्य केले आहे.

किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर मनी लॉड्रिंगचा आरोप करत काही पुरावे ईडीकडे सादर केले होते. फसवणूक करण्यासाठी मंत्रिपदाचा दुरुपयोग आणि लॉकडाऊनच्या नियमांना डावलून 2020मध्ये तीनमजली रिसॉर्ट बांधल्याबद्दल अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सोमय्यांनी केली होती. त्यानंतर अनिल परब यांच्या निवासस्थानावर आणि त्यांच्याशी संबंधित काही लोकांच्या घरी ईडीने छापे टाकले होते. तसेच अनिल परब यांची चौकशी देखील केली होती.

अनिल परब यांचे साई रिसॉर्ट पाडण्याचे काम सुरु करावे असे आदेश आले असून राज्य सरकार उद्या रात्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबतचे आदेश देणार आहे. पर्यावरणासंबंधी 7 लाखांपेक्षा जास्त रुपयांची पेनल्टी लावण्यात आली आहे. तर, रिसॉर्टचे बांधकाम पाडण्यासाठी जवळपास साडेचार कोटी रुपये खर्च येणार असून तो सुद्धा परब यांच्याकडून वसूल करण्यात येणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी आज दिली. रिसॉर्ट बांधण्यासाठी हा पैसा आला कुठून याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

अनिल परब यांनी 19 जून 2019 रोजी पुण्यात राहणाऱ्या विवान साठे यांच्याकडून दापोलीनजीकच्या मुरूड समुद्र किनारी एक कोटी रुपयांमध्ये जागा विकत घेतली. खरेदीखत शेतजमीन म्हणून झाले. पण नंतर 26 जून 2019ला ग्रामपंचायतीला पत्राला लिहिलेल्या पत्रासोबत जागा अकृषिक असल्याचा दाखला देखील जोडण्यात आला, असा दावा सोमय्यांनी यापूर्वीच केला आहे. नंतर लॉकडाऊनच्या काळात म्हणजेच 2020मध्ये अनिल परब यांनी आलिशान साई रिसॉर्ट बांधले. त्यानंतर फेब्रुवारी 2021मध्ये हे रिसॉर्ट परब यांचे भागीदार आणि शिवसेना नेते सदानंद कदम यांच्या नावावर केले, असा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.

First Published on: August 22, 2022 8:00 PM
Exit mobile version