मुंबई महापालिका जिंकण्यासाठी रणनीती; भाजपाचा उद्या कार्यकर्ता मेळावा

मुंबई महापालिका जिंकण्यासाठी रणनीती; भाजपाचा उद्या कार्यकर्ता मेळावा

मुंबई : राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर भाजपाचे लक्ष राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांवर आहे. त्यातही गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचे लक्ष्य आता भाजापाचे आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा उद्या आयोजित करण्यात आला आहे.

राज्यातील राजकीय समीकरणे गेल्या दीड महिन्यात बदलली आहेत. हे राजकारण आता शिवसेनेतील दोन गट आणि भाजपा यांच्याभोवती फिरत आहे. भाजपाने शिंदे गटाला बरोबर घेत राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपाला मुंबई महापालिकेतील सत्ता मिळवायची आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचाराच्या हंड्या फोडायला सुरुवात झाली आहे. आता मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी आम्ही यावेळी फोडणार आहोत आणि त्यातील लोणी गोरगरिबांपर्यंत पोहोचवणार आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगून भाजपाच्या पुढील रणनीतीचे संकेतच दिले.

वरळी हा शिवसेना नेते व माजी आमदार आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. वरळीमध्ये शिवसेनेचे तीन आमदार आणि एक खासदार आहे. तरीही भाजपाने वरळीच्या जांबोरी मैदानात दहीहंडी साजरी केली. ही आगामी महापालिका निवडणुकीची नांदीच आहे. विशेष म्हणजे, आजच्या दहिहंडी उत्सवामध्ये मुंबईत भाजपाचाच वरचष्मा पाहायला मिळाला. देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपाचे नवनियुक्त अध्यक्ष आशीष शेलार, प्रवीण दरेकर, राम कदम यांनी मोठ्या प्रमाणावर दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला.

याशिवाय, सन 2017मध्ये झालेली मुंबई महापालिका निवडणूक भाजपा आणि शिवसेनेने स्वतंत्रपणे लढविली होती. त्या निवडणुकीची जबाबदारी आशीष शेलार यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यात तब्बल 83 जागा जिंकत शेलार यांनी आपले नेतृत्व गुण दाखविले होते. त्याआधी भाजपाच्या मुंबई मनपात अवघ्या 33 जागा होत्या. त्यामुळे त्यांची मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेनेतील मोठा गट जरी भाजपाबरोबर असला तरी, मुंबईतील बहुतांश आमदार व नगरसेवक हे अजूनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा उद्या सकाळी 11 वाजता माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. या मेळाव्याचे नावच ‘लक्ष्य 2022 मुंबई ध्येयपूर्ती’ असे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे यात मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे. या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस प्रमुख मार्गदर्शक आहेत. आशीष शेलार यांच्या हाती मुंबई अध्यक्षपदाची सूत्रे आल्यानंतर होणारा हा पहिलाच मेळावा आहे. या मेळाव्याला मुंबई भाजपाचे माजी अध्यक्ष मंगलप्रभात लोढा हे देखील सहभागी होणार आहेत.

First Published on: August 19, 2022 7:09 PM
Exit mobile version