वरळीमध्ये भाजपाला आव्हान देण्याचे धाडस कोणी करू नये, आमदार नितेश राणेंचा इशारा

मुंबई : वरळी हा शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघावर भाजपाने लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशीष शेलार यांनी वरळीत भव्य दहीहंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. या पार्श्वभूमीवर वरळीमध्ये भाजपाला आव्हान देण्याचे धाडस कोणी करू नये, असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणूक लवकरच होणार आहे. गेली 25 वर्षे मुंबई मनपामध्ये शिवसेनेची सत्ता आहे. राज्याप्रमाणेच महापालिकेतही शिवसेनेला खाली खेचून सत्ता मिळवण्याचे लक्ष्य भाजपाचे आहे. त्यामुळेच यावेळच्या मुंबईतील दहीहंडी उत्सवावर भाजपाचा वरचष्मा पाहायला मिळाला. त्यातही भाजपा आमदार आशीष शेलार यांनी वरळीत शिवसेनेचे तीन आमदार आणि एक खासदार असतानाही जांबोरी मैदानावर भव्य दहीहंडीचे आयोजन केले होते. एरवी सचिन अहिर यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सव साजरा केला जात होता. त्यावर आदित्य ठाकरे यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुका येतील, तेव्हा येतील. पण प्रत्येक गोष्टीत राजकारण आणण्याचा बालिशपणा कोणी करू नये, असा टोला त्यांनी लगावला.

या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. विधानसभेच्या पायऱ्यांवर नुसते म्याव म्याव केल्यावर काय झाले होते, हे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे उगाच डरकाळी फोडण्याचा प्रयत्न कोणी करू नये. तसेच भाजपाला वरळीमध्ये कोणी आव्हान देण्याचे धाडस कोणी करू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे.

…आणि आदित्य ठाकरेंनी केले दुर्लक्ष
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी, 23 डिसेंबरला त्यावेळी भाजपासह अन्य विरोधक विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकार विरोधात घोषणाबाजी करत होते. त्यावेळी तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे तेथून जात असताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी त्यांना बघून ‘म्याव-म्याव’ असा काढला. पण, आदित्य ठाकरे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि ते तसेच पुढे गेले.

First Published on: August 19, 2022 11:05 PM
Exit mobile version