…म्हणून राज्यात सर्वसामान्यांचे सरकार स्थापन झाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रतिपादन

…म्हणून राज्यात सर्वसामान्यांचे सरकार स्थापन झाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रतिपादन

मुंबई : यंदाची दहीहंडी ही खऱ्या अर्थाने हिंदुत्वांची दहीहंडी आहे. तुम्ही दहीहंडीमधील हंडी फोडत आहात. आम्ही पण दीड महिन्यापूर्वी 50 थर लावून मोठी हंडी फोडली. त्यामुळे आज या राज्यात सर्वसामान्यांचे सरकार स्थापन झाले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मागाठाणेमध्ये केले.

भाजपा मागाठाणे विधानसभा आणि शिवराज प्रतिष्ठान आयोजित दहिसर, अशोकवन येथे दहिहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपली परंपरा व संस्कृती जोपासण्याचे काम गोविंदा करीत असतात. आज गोविंदांच्या चेहऱ्यांवर प्रचंड उत्साह जाणवत आहे. कोविडमुळे गेली दोन वर्षे दहीहंडी उत्सवावर निर्बंध होते. परंतु उपमुख्यमंत्री व आम्ही ठरविले की, सर्व सण-उत्सव राज्यात जल्लोषात साजरा व्हायला पाहिजेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी व भाजप-शिवसेना विचाराचे सरकार आज महाराष्ट्रात स्थापन झाले आहे. त्यामुळे येणारे सर्व सण व उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करुया, आपली संस्कृती व परंपरा पुढे नेऊया व राज्य सर्व सामान्यांचे आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे सरकार आहे. सर्व सामान्यांना न्याय देणारे हे सरकार आहे, असेही ते म्हणाले.

आपले सरकार आल्यानंतर दहीहंडी व गणेशोत्सव यावरील सर्व निर्बंध दूर झाले आहेत. याचप्रमाणे नवरात्री उत्सवही उत्साहात साजरा केला जाणार आहे. आता सर्व खुले खुले वाटत आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. लवकरच मुख्यमंत्री आणि आम्ही मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडणार आहोत आणि त्यामधील विकासाची मलई ही प्रत्येक शेवटच्या माणसांपर्यंत विकासाच्या रुपात पोहचविणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

आता दहीहंडी उत्सवात सहभागी होणारे गोविंदा हे फक्त गोविंदा राहिलेले नाहीत, तर ते आता खेळाडू झाले आहेत. या खेळाडूंना सर्व सवलती मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्या आहेत. गोविंदांना मुख्यमंत्र्यांनी 10 लाखांचे विमा कवच व तर मुंबई भाजपाच्यावतीने आशीष शेलार यांनीही 10 लाखांचे कवच दिले आहे.

राज्य सरकारने गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा दिल्याबद्द्ल गोविंदांच्यावतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल भाजपाचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. राज्य सरकारने गोविंदांना विमा कवचही दिले, तसेच कोविडनंतर सुमारे दोन वर्षांनी दहीहंडी उत्सवावरील सर्व निर्बंध राज्य सरकारने दूर करुन गोविंदांसह राज्यातील कोट्यवधी नागरिकांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण मिळवून दिला आहे, असेही दरेकर यांनी सांगितले.

याप्रसंगी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशीष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी, कृपाशंकर सिंह, दहीहंडी उत्सवाचे आयोजक मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष प्रकाश दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. अशोकवन येथील दहिहंडी उत्सवात 1 लाख 11 हजार 111 रुपयांची दहीहंडी लावण्यात आली होती. यावेळी सुमारे 250 गोविंदांनी दहीहंडीला सलामी दिली. यावेळी विविध दहीहंडी पथकांना अनेक पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

First Published on: August 19, 2022 9:02 PM
Exit mobile version