ठाकरे गट काश्मीर निवडणूक लढवण्यावर दरेकर अन् शिरसाटांची टीका, म्हणाले…

ठाकरे गट काश्मीर निवडणूक लढवण्यावर दरेकर अन् शिरसाटांची टीका, म्हणाले…

मुंबईः ठाकरे गट जम्मू- काश्मिरमध्ये निवडणुका लढवणार आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी जाहिर केले. यावरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट व भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रविण दरेकर यांनी खासदार राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

आमदार प्रविण दरेकर म्हणाले, संजय राऊत यांनी आधी नगरसेवक पदाची निवडणूक लढवावी. जिंकून यावे. मग जम्मू-काश्मिरच्या निवडणुकीबाबत बोलावे. सरडा जसा रंग बदलतो. तसे संजय राऊत आपले राजकीय रंग बदलत आहेत. त्यांना त्यांचे पक्षप्रमुख पंतप्रधान व्हावेत, असे वाटत होते. आता त्यांचे कॉंग्रेसवर प्रेम आले आहे. त्यांनी शिवसेनेची वाट लावली. तर शिंदे गटाचे आमदार संजय शिंरसाट म्हणाले, राऊत काश्मिरची काय अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाचीही निवडणूक लढवतील. त्यांच्यामध्ये एवढा आत्मविश्वास येतो कुठून.

खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी खासदार राऊत हे जम्मू येथे गेले होते. या यात्रेत सहभागी झाल्यानंतर खासदार राऊत यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद सांधला. राऊत यांनी जम्मू-काश्मिरच्या निवडणुका शिवसेना लढवणार असल्याचे सांगितले होते. यावेळी त्यांनी शिवसेना फुटीवरही भाष्य केले होते. ते म्हणाले, उद्या ते जो बायडनची पार्टी जाऊन फोडतील. त्यामुळे त्यांचा विषय सोडून द्या. शिवसेना ही एकच आहे. दुसरी शिवसेना होऊ शकत नाही. काही खासदार व आमदार फुटले म्हणून शिवसेना संपत नाही. शिवसेना जमीनीवर आहे. गेले तीन ते चार महिने निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. त्यावर निकाल लागत नाही. याबाबत दबाव तंत्र वापरले जात आहे, असा आरोप खासदार राऊत यांनी केला.

शिवसेना जम्मू-काश्मिरमधील निडवणूक लढवणार आहे. आमचा जाहिरनामा नसतो. आमचा वचननामा असतो. येथील तरुणांना रोजगार देण्यासाठी व अन्य मुळ प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना तत्पर असेल, असे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले.त्यावरून खासदार राऊत यांच्यावर शिंदे गट व भाजपच्या आमदारांनी टीका केली.

First Published on: January 21, 2023 5:24 PM
Exit mobile version