शिवसैनिकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे, दीपाली सय्यद यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

शिवसैनिकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे, दीपाली सय्यद यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट लवकरच एकत्र येणार असे ट्वीट शिवसेनेच्या पदाधिकारी दीपाली सय्यद यांनी केले आहे. त्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांची कानउघाडणी केली आहे. दीपाली सय्यद अभिनेत्री आहेत. त्या पक्षाचे काम करतात. त्यांना हे अधिकार कोणी दिले याची मला माहिती नाही, असे त्यांनी सुनावले आहे. पण नंतर पत्रकार परिषद घेऊन दीपाली सय्यद यांनी त्याला प्रत्युत्तर दिले.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी ‘उठाव’ केला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केले आहे. ही गोष्ट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागली आहे. या पार्श्वभूमीवर अलीकडेच दीपाली सय्यद यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी दोन्ही गट एकत्र येण्यासंदर्भातील ट्वीट केले.

हेही वाचा – ‘त्या’ बॅग नक्की कोणासाठी? निलेश राणेंचा विनायक राऊतांना सवाल

शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे हे येत्या दोन दिवसांत पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार असल्याचे समजल्यावर खूप बरे वाटले. शिंदे यांना शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव ठाकरे यांनी कुटुबप्रमुखांची भूमिका मोठ्या मनाने निभावली, हे स्पष्ट झाले आहे. यात मध्यस्थी करीता भाजपा नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यबाद! चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल. असे ट्वीट दीपाली सय्यद यांनी केले होते.

संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते असल्याने त्यांनी दीपाली सय्यद यांचा समाचार घेताना, त्या अभिनेत्री आहेत. पक्षाचे काम करतात. त्यांना हे अधिकार कोणी दिले, याची मला माहिती नाही. अशा प्रकारची वक्तव्यं खूप काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे, असे सुनावले होते. त्यानंतर लगेचच पत्रकार परिषद घेऊन दीपाली सय्यद यांनी आपली भूमिका स्पष्ट केले. उभय नेत्यांची भेट घेतल्यानंतर त्या दोघांनाही एकत्र यायचे आहे, असे मला जाणवले. दोघांनीही एकत्र यावे, हीच माझी भावना आहे आणि एक शिवसैनिक म्हणून आपल्याला व्यक्त होण्याचा अधिकार आहे. त्यासाठी कोणाची परवानगी घेण्याची आवश्यकता वाटत नाही, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.

हेही वाचा – उपराष्ट्रपती पदासाठी NDAकडून जगदीप धानखर यांना उमेदवारी जाहीर

First Published on: July 17, 2022 11:57 AM
Exit mobile version