मुंडेंच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस अनुपस्थित, राजकीय वर्तुळात चर्चा!

मुंडेंच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस अनुपस्थित, राजकीय वर्तुळात चर्चा!

नाशिक – भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे पक्षावर नाराज असलेल्या चर्चा सातत्याने समोर येत असतात. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात राजकीय मतभेद असल्याचंही राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात बोललं जातं. त्यातच, आज भाजपाचे दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथे आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्र्यांसह मुख्यमंत्री आणि अनेक नेते उपस्थित असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र गैरहजर आहेत. या कार्यक्रमासाठी त्यांना आमंत्रण नव्हतं की त्यांनी जाणीवपूर्वक या कार्यक्रमाला येणं टाळलं अशा उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथे आज गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक आणि पूर्णाकृती पुतळ्याच अनावरण केले जात आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भारती पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, दादा भुसे यांच्यासह राज्यातील अनेत नेते उपस्थित आहेत. मात्र, या नेतेमंडळींच्या मांदियाळीत अनुपस्थित राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांचीच अधिक चर्चा होत आहे.

देवेंद्र फडणवीसांना आमंत्रण दिलं नाही, की त्यांना आमंत्रण देऊनही त्यांनी ते स्विकारलं नाही, किंवा आधीच नियोजित दौरा असल्याने ते येथे आले नाहीत, अशा अनेक शंका-कुशंकांना येथे वाव आहे.

पक्षातून सातत्याने डावलले जात असल्याने पंकजा मुंडे भाजपच्या महाराष्ट्राच्या नेतृत्त्वावर नाराज आहेत. २०१९ मध्ये विधानसभेचं तिकिट नाकारण्यात आल्याने त्यांची नाराजी वाढली. त्यानंतर विधान परिषदेतही त्यांची वर्णी लागू शकली नाही. दरम्यान, त्यांच्याकडे केंद्रीय स्तरावर मोठं पद देणार असल्याचं सातत्याने बोललं जात आहे. मात्र, अद्यापही केंद्रीय स्तरावर त्यांच्याकडे पद आलेलं नाही. फक्त त्यांच्याकडे सध्या मध्य प्रदेशचे प्रभारीपद आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांचा फडणवीसांवर थेट रोख असल्याचंही सांगितलं जातं. यामुळेच कदाचित फडणवीसांनी या कार्यक्रमात येणं टाळलं असावं, अशी चर्चा आहे.

First Published on: March 18, 2023 2:51 PM
Exit mobile version