‘मलाही पाहिजे’, यावरून अडलंय नव्या मंत्र्यांचे खातेवाटप?

‘मलाही पाहिजे’, यावरून अडलंय नव्या मंत्र्यांचे खातेवाटप?

मुंबई : पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने काही आमदार नाराज आहेत. तर, ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे, त्यापैकी अनेक जण विशिष्ट खात्यांसाठी आग्रही असल्याने खातेवाटप रखडले आहे, असे सांगितले जाते. भाजप कडूनच खातेवाटपाला विलंब होत असल्याचे समजते.

महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 28 जून 2022 रोजी राजीनामा दिला आणि लगेच 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पण त्यांच्या मंत्रिमंळाचा विस्तार मात्र तब्बल 40 दिवसांनी झाला. नव्या 18 मंत्र्यांचा शपथविधी होऊन चार दिवस झाले तरी खातेवाटप झालेले नाही. वस्तुत: 17 ऑगस्टपासून विधिमंळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्याआधी खातेवाटप होणे गरजचे आहे. मात्र शिंदे गट आणि भाजपा तसेच नव्या मंत्र्यांमध्ये ‘मलाही पाहिजे,’ या हटवादी भूमिकेमुळे खातेवाटप रखडल्याचे सांगितले जाते.

भाजपाकडे तब्बल 106 आमदार असताना मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. याची खंत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अलीकडच्या भाजपा कार्यकारिणी बैठकीत व्यक्त केली होती. आता गृह, महसूल, अर्थ, जलसंपदा, सहकार, ग्रामविकास ही महत्त्वाची खाती भाजपाला हवी आहेत. तर, फडणवीस सरकारच्या काळात शिवसेनेच्या वाट्याला जी खाती आली होती, तीच खाती पुन्हा देण्याची तयारी भाजपाने दर्शविली असल्याचे सांगितले जाते.

मात्र तर शिंदे गटाने आधीच्या उद्योग, परिवहन, आरोग्य, कृषी या खात्यांबरोबरच गृह. महसूल, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास खात्यांसाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तथापि, मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, सामान्य प्रशासन खाते राहणार आहे, असे समजते.

याशिवाय या 18 मंत्र्यांपैकी काहींनी काही खात्यांवर दावा सांगितला आहे. त्यामुळे देखील खातेवाटपाचे घोडे अडले आहे. गृह खात्यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दोघेही अडून बसले आहेत. भाजपाला अर्थ आणि सहकार खाते हवे असतानाच शिंदे गटाच्या दीपक केसरकर यांना अर्थ तर, गुलाबराव पाटील यांना सहकार हवे आहे, असे सांगितले जाते. एकीकडे, महसूल खात्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपाच्याच राधाकृष्ण विखे पाटील यांनी दावा सांगितला असतानाच दुसरीकडे, शिंदे गटाच्याच तानाजी सावंत व उदय सामंत यांच्यात उच्च आणि तंत्रशिक्षण या खात्यावरून रस्सीखेच असल्याचे सूत्रांनी सांगितले.

First Published on: August 12, 2022 10:44 AM
Exit mobile version