गुजरात मंत्रिमंडळात राजपूत सर्वात करोडपती तर दोघे लखपती

गुजरात मंत्रिमंडळात राजपूत सर्वात करोडपती तर दोघे लखपती
गुजरात : गुजरातमध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात बलवंत सिंह राजपूत हे सर्वात श्रीमंत मंत्री आहेत तर सर्वात कमी संपत्ती मुकेशभाई पटेल व बच्चूभाई खाबड यांची आहे. तसेच या मंत्रिमंडळात आठवी पास पासून ते पीएचडी झालेले मंत्री आहेत.
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांचा शपथविधी सोमवारी पार पाडला. या मंत्रिमंडळात आठ जुने चेहरे आहेत तर आठ नवीन चेहेरे आहेत. यामध्ये सर्वात श्रीमंत मंत्री बलवंत सिंह राजपूत यांची संपत्ती ३७२ कोटी ६५ लाख ३४ हजार ८०१ रुपये आहे. त्यांची २६६ कोटी रुपयांची जंगम तर १०२ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या बँक खात्यात सहा कोटी रुपयांची रोकड आहे. ४.८१ कोटी रुपयांचे दागिने आहेत. असे असले तरी बलवंत सिंह राजपूत यांच्याकडे स्वत:ची गाडी नाही.
बलवंत सिंह राजपूत यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे चार कोटी रुपयांची कृषि जमीन आहे. २२ कोटी रुपयांची बिनशेती जमीन आहे. ३२ कोटी रुपयांची व्यावसायिक इमारत आहे तर ४३ कोटी रुपयांची रहिवासी इमारत आहे. त्याचे बाजारमूल्य १०६ कोटी रुपये आहे.
सर्वात कमी संपत्ती असलेल्या बच्चूभाई खाबड यांची मालमत्ता ९२.८५ लाख रुपये तर मुकेशभाई यांची संपत्ती ९७.१७ लाख रुपये आहे. या व्यतिरिक्त अन्य मंत्र्यांची संपत्ती एक कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रक्कमेची आहे.
तसेच नवर्निवाचित मंत्री डाॅ. कुबेरभाई डिंडोर हे सर्वात सुशिक्षित मंत्री आहेत. ५१ वर्षीय डिंडोर यांनी २०१२ मध्ये सरदार पटेल महाविद्यालयातून पीएचडी प्राप्त केली आहे.
या मंत्रिमंडळात हर्ष सांघवी हे सर्वात युवा मंत्री आहेत. मात्र त्यांचे शिक्षण हे आठवीपर्यंतच झाले आहे. मागच्या मंत्रिमंडळात हर्ष सांघवी यांच्याकडे गृह खात्याची धुरा होती. तसेच सर्वात वयोवृद्ध मंत्री ७१ वर्षीय कनुभाई मोहनलाल देसाई हे आहेत.
या शपथविधीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थितीत होते.
First Published on: December 12, 2022 7:43 PM
Exit mobile version