सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून हालचालींना वेग; क्षितीज ठाकूर, गिता जैन फडणविसांच्या भेटीला

सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून हालचालींना वेग; क्षितीज ठाकूर, गिता जैन फडणविसांच्या भेटीला

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena) यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली आहे. राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. महाविकास आघाडीचे सरकार कधीही कोसळू शकते. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सध्या ३४ आमदार असून त्यांना आणखी काही आमदारांचा पाठिंबा मिळू शकतो असेही बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या पाठिंब्याने भाजप (BJP) सरकार स्थापन करू शकते. तशा हालचालीही आता सुरू झाल्या आहेत.

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे सागर निवासस्थान आता सत्ता स्थापनेच्या दिशेने  होत असलेल्या घडामोडींचे केंद्रस्थान बनले आहे. बहुमताचा आकडा जुळवण्याच्या दृष्टीने वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपकडून अपक्षांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मिरा-भाईंदरच्या अपक्ष आमदार गिता जैन आणि बहुजन विकास आघाडीचे (बविआ) आमदार क्षितीज ठाकूर सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या तिन्ही आमदारांचा फडवणीस यांना पाठिंबा मिळणार हे निश्तिच आहे.

भाजपला सत्ता स्थापन करायची असल्यास त्यांना पाठिंबा देणारा शिवसेनेतून बाहेर पडणारा गट हा ३७ आमदारांचा असणे आवश्यक आहे.  पक्षांतर बंदी कायद्यानुसार दोन तृतीयांश सदस्य बाहेर पडले तरच तो गट वैध असेल. त्यामुळे शिंदे यांच्यासोबत कमीत कमी ३७ आमदार कायम राहिले तरच भाजपला सत्ता स्थापन करता येईल. त्यामुळे भाजपने आता अपक्ष आणि छोटे पक्ष यांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिंदेंच्या बंडखोरीमुळे राज्यात सत्तापालट होणार हे निश्चित आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करण्याठी भाजपच्या गोटात हालचालींचा वेग आला आहे.

भाजपचे विधानसभेत १०६ संख्याबळ आहे. भाजपला १३ अपक्षांचाही पाठिंबा आहे. तर अपक्ष आमदार गिता जैन आणि बविआचे तीन आमदार असे भाजपचे एकूण संख्याबळ १२३ वर जाते. आणखी अपक्ष आणि इतर पक्षातील नाराजांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याची जबाबदारी गिरीश महाजन आणि आशिष शेलार यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

First Published on: June 22, 2022 4:48 PM
Exit mobile version