नारायण राणेंची नार्को टेस्ट करा; विनायक राऊत आक्रमक

नारायण राणेंची नार्को टेस्ट करा; विनायक राऊत आक्रमक

सिंधुदुर्गः नारायण राणे यांच्या राजकीय कारकिर्दीत जेवढे खून झाले. जेवढे लोक बेपत्ता झाले. त्या सगळ्याची एसआयटी चौकशी झाली पाहीजे नाहीतर नारायण राणे यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी सोमवारी केली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने कणकवली तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळा सोमवारी कणकवलीतील मातोश्री मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सरपंच उपसरपंच व सदस्यांना गौरविण्यात आले.

ग्रामपंचायत निवडणुकीत कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी घेतलेली गरुड झेप उद्या या विधानसभेवर भगवा फडकविणारी गरुड झेप ठरेल यात कोणतीही शंका नाही, असे गौरोवोद्गगार खासदार विनायक राऊत यांनी यावेळी काढले.
खासदार विनायक राऊत पुढे म्हणाले, उद्धव व आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करायची एवढेच त्यांना काम आहे. मात्र इतरांवर टीका करताना नितेश राणे यांनी वडिलांची राजकारणातील कारकीर्द आठवावी. सख्या चुलत भावाचे घराच्या समोर डोकं फोडून गाडीत घालून नांदगावला नेऊन जाळून टाकलं असा राणे यांचा इतिहास आहे. नारायण राणे यांच्या राजकीय कारकिर्दीत जेवढे खून झाले. जेवढे लोक बेपत्ता झाले. त्या सगळ्यांची एसआयटी चौकशी झाली पाहिजे नाहीतर नारायण राणे यांची नार्को टेस्ट करण्यात यावी. जेणेकरून रक्तरंजित इतिहास कोणी घडविला हे सर्वांना कळेल, असा दावा खासदार राऊत यांनी केला.

२०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेची सत्ता जिल्ह्यात आली. तेव्हापासून जिल्ह्यात एकही राजकीय बळी गेला नाही. आम्हाला जिल्ह्यात शांतात हवी आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे, असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे व राणे यांच्यात संघर्ष सुरु आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी दिशा सालियन आत्महत्येचा मुद्दा उकरून काढला. त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्याची मागणी हिवाळी अधिवेशनात केली. त्यानुसार शिंदे-फडणवीस सरकारने दिशा सालियन आत्महत्येची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली.

First Published on: January 2, 2023 9:32 PM
Exit mobile version