विधान परिषद निवडणूक : रामराजे नाईक निंबाळकर यांनीही घेतली हितेंद्र ठाकूरांची भेट

विधान परिषद निवडणूक : रामराजे नाईक निंबाळकर यांनीही घेतली हितेंद्र ठाकूरांची भेट

विधान परिषद निवडणूक (maharashtra legislative council elections ) २० जून रोजी होणार असून 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha elections) पराभव झाल्यानंतर आता महाविकास आघाडीने विधान परिषद निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. राज्यसभा निवडणुकीत लहान पक्ष आणि अपक्षांची मोठी भूमिका राहिली आहे. अपक्ष आणि लहान पक्षाच्या आमदारांमुळे महाविकास आघाडीचा पराभव झाल्याचे बोलले जाते.

विधान परिषद निवडणुकीत गुप्त मतदान पद्धती आहे. त्यामुळे लहान पक्ष आणि अपक्षांना वळवण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरू केले जात आहेत. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीची ३ मते निर्णायकी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची मते मिळवण्यासाठी उमेदवारांनी  बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेण्यासाठी विरारची वारी सुरू केली आहे. गुरूवारी विधानपरिषदेचे सभापती आणिराष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी देखील हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांची भेट घेतली आहे.

दुपारी अडीच वाजताच्या सुमारास रामराजे विरारमध्ये दाखल झाले. विवा कॉलेजमध्ये दोघांमध्ये बंद दाराआड दीड तासापेक्षा अधिक काळ चर्चा झाली. हितेंद्र ठाकूरांसह तिघा आमदारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीचं मत द्यावं, अशी विनंती रामराजेंनी केल्याचे बोलले जात आहे. यावेळी हितेंद्र ठाकूर आणि रामराजे यांनी एकत्र जेवणही केले.

याआधी काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांनी मंगळवारी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. बहुजन विकास आघाडीची तीन मतं महाविकास आघाडीला मिळाल्यास विजयाला गवसणी घालणं अधिक सोेप होऊ शकतं. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांनी आपली तीन मते द्यावी, अशी विनंती भाई जगताप यांनी केल्याचे सांगितले जात आहे.आतापर्यंत भाई जगताप यांच्यासह भाजपच्या मनीषा चौधरी आणि राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे पाटील यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आहे. बहुजन विकास आघाडीकडे हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर व राजेश पाटील अशी तीन मते आहेत.

विधान परिषद निवडणुकीत पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी  उमेदवाराला २७ मतांची गरज आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार महाविकास आघाडीचे १५२ भाजपचे १०६, अपक्ष तेरा आणि छोट्या पक्षाचे १६ असे २८७ आमदार विधानसभेत आहेत. तर मंत्री नबाव मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना मतदानाचा हक्क न्यायालायने नाकारला आहे. त्यामुळे २७ मतांचा कोटा थोडा कमी होण्याची शक्यता आहे.

पक्षनिहाय उमेदवार

शिवसेना :  सचिन अहिर, आमशा पाडवी

राष्ट्रवादी काँग्रेस : रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे, शिवाजी गर्जे

काँग्रेस : भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे

भाजप  :  प्रवीण दरेकर, राम शिंदे,  श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत

First Published on: June 16, 2022 5:30 PM
Exit mobile version