ते माझ्या पक्षाचे नेते नाहीत; राऊतांचा आंबेडकरांवर पलटवार

ते माझ्या पक्षाचे नेते नाहीत; राऊतांचा आंबेडकरांवर पलटवार

मुंबईः माझा सल्ला नाही मानायचा तर नका मानू. प्रकाश आंबेडकर हे काही माझ्या पक्षाचे नेते नाहीत. मी कोण आहे हे उद्धव ठाकेर यांना माहिती आहे, असा पलटवार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी केला.

शरद पवार हे अजूनही भाजपसोबतच आहेत, असे विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले. त्यावरुन महाविकास आघाडीत धुसफुस सुरु झाली. महाविकास आघाडीच्या स्तंभावर बोलू नका, असा सल्ला संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिला. हा सल्ला उद्वव ठाकरे यांनी दिला असता तर ऐकला असता, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्याबाबत खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, मी कोण आहे हे उद्धव ठाकरे यांना माहिती आहे. प्रकाश आंबेडकर हे माझ्या पक्षाचे नेते नाहीत. माझे आणि त्यांचे काही वैर नाही. आता त्यांच्यासोबत आमची युती झाली आहे. त्याआधीही त्यांच्यासोबत माझे चांगले संबंध होते. प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत माझ्या मनात आदर आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या नसा नसात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत वाद होईल, असे वक्तव्य कोणी करु नये एवढेच माझे म्हणणे आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीची संकल्पना शरद पवार यांनी माडंली. त्यामुळेच भाजप सत्तेपासून दूर राहिले. नंतर भाजपने कारस्थान करुन महाविकास आघाडीचे सरकार पाडले. या सर्व गोष्टी प्रकाश आंबेडकर यांनी माहिती आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्याविषयी बोलताना संयम ठेवायला हवा. हे माझे वैयक्तित मत नाही. महाविकास आघाडीचे हे मत आहे. तरीही माझे याबाबत शरद पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यामुळे आम्ही एकत्र बसून यावर तोडगा काढू, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

नवीन राज्यपाल आला तरी सुत्रे दिल्लीतूनच हलणार

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना जावेच लागेल. त्यांना कधी घालवायचे याचा मुहुर्त ते शोधत आहेत. राज्यपाल कोश्यारी यांच्या जागी दुसरं कोणी आलं तरी सर्व सुत्रे दिल्लीतूनच हलणार आहेत. तसेच चिंचवड जागेचा निर्णय महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसूनच घेतील, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

 आम्ही ४० जागा जिंकू

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ३४ जागा मिळतील असा निष्कर्ष एका अहवालातून मांडण्यात आला आहे. मात्र त्यापेक्षाही जास्त जागा आम्हाला मिळतील. महाविकास आघाडीला ४० जागांवर विजय मिळेल. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात सत्तांतर झाले आहे, ते लोकांना पटलेले नाही. लोकांच्या मनात राग आहे. लोकं निवडणुकीची वाट बघत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला जास्तच जागा मिळतील.

First Published on: January 27, 2023 7:26 PM
Exit mobile version