माझ्या मना बन दगड, चंद्रकांत पाटील यांची खदखद कायम

माझ्या मना बन दगड, चंद्रकांत पाटील यांची खदखद कायम

मुंबई : पक्षश्रेष्ठींनी ‘शतप्रतिशत भाजपा’चा संकल्प केल्याने महाराष्ट्रासह सर्वच नेते त्यादृष्टीने कामाला लागले आहेत. पण हे लक्ष्य साधण्याच्या धडपडीमध्ये अनेक नेत्यांना आशा-अपेक्षा लपविता आलेल्या नाहीत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील हे त्या नेत्यांपैकीच एक आहेत. आता त्यांनी प्रदेशाध्यक्ष गेल्याबद्दल अप्रत्यक्षरित्या खंत व्यक्त केली आहे.

एकेकाळचे भाजपातील धडाडीचे नेते आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या एकनाथ खडसे यांनी आपली महत्त्वाकांक्षा जाहीररीत्या मांडली आणि ते भाजपात बाजूलाच फेकले गेले. 2014च्या निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश मिळविले आणि त्यावेळी मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात घालण्यात आली. त्यावरून खडसे यांनी याबाबत नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. या पदासाठी ते इच्छुक होते. अशीच भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली होती. मला प्रत्यक्षात मुख्यमंत्री होता आले नसले तरी, राज्यातील जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून मीच आहे, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले होते. त्याही पक्षात बाजूला पडल्याचे चित्र आहे.

एकूणच आपल्या आशा-आकांक्षांपेक्षा पक्षाला प्राधान्य देण्याची सूचना पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आल्या आहेत. याचा प्रत्यय राज्यातील सत्ताबदलाच्या वेळी पाहायला मिळाला. मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव घोषित करताना आपण सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. पण नंतर पक्षादेशानुसार उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले. हीच खदखद भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पनवेल येथील प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत व्यक्त केली होती. मनावर दगड ठेवून आपण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याचे ते म्हणाले होते.

तर, 2019च्या निवडणुकांमध्ये पुन्हा भाजपाचीच हवा होती. त्यामुळे पक्षात इनकमिंग जोरात सुरू होते. तेव्हाही चंद्रकांत पाटील यांनी मनातील सल व्यक्त केली होती. मेगाभरतीमुळे पक्षाची संस्कृती विचलित झाल्याची कबुली त्यांनी दिली होती. उमेदवारी मागावी लागू नये, ही भाजपाची संस्कृती असून मेगाभरतीमध्ये तिलाच काहीसा धक्का लागल्याचे ते म्हणाले होते. एकप्रकारे मनावर दगड ठेवून त्यांनी ही मेगाभरती स्वीकारली होती.

तर आता पुन्हा एकदा एका मुलाखतीत मंत्रीपदापेक्षा पक्षनेतृत्वासाठी प्रदेशाध्यक्षाला प्राधान्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. राज्य मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाल्याने त्यांना प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागले होते. एकप्रकारे मनावर दगड ठेवून याही वेळेस त्यांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागली आहे, असेच दिसते.

First Published on: September 17, 2022 3:13 PM
Exit mobile version