अंधेरी पोटनिवडणूक : ‘मातोश्री’च्या दिरंगाईत लटकली ऋतुजा लटकेंची उमेदवारी, अन्य चार नावे चर्चेत

अंधेरी पोटनिवडणूक : ‘मातोश्री’च्या दिरंगाईत लटकली ऋतुजा लटकेंची उमेदवारी, अन्य चार नावे चर्चेत

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभेची निवडणूक जाहीर झाली असली तरी, तेथून भाजपाकडून अद्याप उमेदवाराची अधिकृत घोषणा झालेली नाही. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र पालिकेतील त्यांच्या राजीनाम्याबाबतचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले आहे. आमदार रमेश लटके यांचे मे महिन्यात निधन झाल्यानंतर नोव्हेंबरपर्यंत निवडणूक होणे क्रमप्राप्त होते. त्यामुळेच मातोश्रीकडून दिरंगाई झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 40 आमदारांनी जून महिन्यात केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. अशातच अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी, शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवरही पोटनिवडणूक होत असल्याने ती अतिशय प्रतिष्ठेची झाली आहे. भाजपचे उमेदवार म्हणून मुरजी पटेल यांच्या नावाची चर्चा असली तरी, तशी अधिकृत घोषणा झालेली नाही.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली असली तरी, आधी आपले मुख्यमंत्रीपद, नंतर शिवसेना पक्षप्रमुखपद, पक्षाचे नाव आणि चिन्ह वाचविण्याच्या गडबडीतच या पोटनिवडणुकीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याचा फटका आता बसला आहे. या निवडणुकीची दखल वेळीच घेऊन पावले उचललेी असती तर, हा राजीनाम्याचा पेच निर्माण झाला नसता.

काय आहे पेच?
ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेच्या सेवेत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याआधी त्यांनी मुंबई पालिका प्रशासनाकडे आपल्या पालिका नोकरीचा राजीनामा दिलेला आहे. राजीनामा मंजूर करावा, यासाठी त्यांनी नियमानुसार एका महिन्याचे वेतनही पालिका कोषागारात जमा केले आहे. मात्र महापालिकेने अद्याप त्यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही. पालिकेच्या या वेळकाढूपणामुळे त्यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. मुंबई पालिकेने माझा राजीनामा मंजूर करावा, अशी मागणी करणारी याचिका त्यांनी न्यायालयात केली आहे.

नेमकी दिरंगाई कशी झाली?
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार रमेश लटके यांचे 11 मे 2022 रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यानंतर नियमानुसार या रिक्त जागेसाठी सहा महिन्यांच्या आता पोटनिवडणूक अपेक्षित होती. म्हणजेच 10 नोव्हेंबरच्या आत निवडणूक कार्यक्रम लागणे निश्चित होते. शिवसेनेने अनेकदा एखाद्या लोकप्रतिनिधीचे निधन झाले की त्याच्या पत्नीला वा कुटुंबातील एखाद्या समदस्याला उमेदवारी दिली आहे. त्यामुले रमेश लटके यांच्या निधनानंतर तसा निर्णय लागलीच घेतला गेला नाही.

केंद्रीय निवडणूक आयोगाने 3 ऑक्टोबर 2022 रोजी याबाबतची अधिसूचना जारी केली. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 14 ऑक्टोबर 2022 ही शेवटची तारीख असून 17 ऑक्टोबर 2022पर्यंत अर्ज मागे घेता येईल. तर, 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. म्हणजेच एवढा वेळ हाती असतानाही ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीची प्रक्रिया सुरू केली नाही.

दिरंगाईचे नेमके कारण काय?

  1. आमदार रमेश लटके यांचे 11 मे 2022 रोजी निधन झाल्यावर साधारणपणे महिन्याभराने शिवसेनेत बंडाच्या हालचाली सुरू झाल्या आणि जून अखेरीला या बंडामुळे शिवसेनेत फूट पडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यामुळे तोपर्यंत उद्धव ठाकरे आणि त्यांच्याबरोबरचे नेते मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचविण्यात व्यग्र होते.
  2. त्यानंतर शिंदे गटाने शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा केल्याने हे चिन्ह वाचविण्याची धडपड ठाकरे गटाकडून सुरू झाली. आधी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे, मग सर्वोच्च न्यायालयात आणि पुन्हा निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण गेले.
  3. निवडणूक आयोगाने चिन्ह आणि नाव तात्पुरत्या स्वरूपात गोठवण्याचा निर्णय घेतल्यावर नवीन नाव आणि नवीन चिन्ह ठरविण्यात ठाकरे गट व्यग्र झाला.
  4. याच दरम्यान शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्यावर देखील शिंदे गटाने दावा केला. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने ठाकरे गटाला दिलासा दिला.

चौघांची नावे चर्चेत
ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा पेच सध्या मुंबई उच्च न्यायालयात आहे. हा निकाल जर विरोधात गेला तर, कोणाला उमेदवारी मिळू शकते. याबाबत चर्चा सुरू आहे. त्यात चौघांची नावे आघाडीवर आहेत. माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, माजी नगरसेवक प्रमोद सावंत, काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले माजी नगरसेवक कमलेश राय आणि माजी नगरसेवक मनोहर पांचाळ यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते, असे म्हटले जाते.

First Published on: October 13, 2022 2:01 PM
Exit mobile version