बेकायदा सरकार लवकरच घरी जाईल; संजय राऊत यांचा दावा

बेकायदा सरकार लवकरच घरी जाईल; संजय राऊत यांचा दावा

मुंबईः महाविकास आघाडी सरकार कसे पाडले व शिवसेना कशी फोडली हे मावळत्या वर्षाने पाहिले. पण नवीन वर्षात शिंदे-फडणवीस सरकार घरी जाईल, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी केला.

ते म्हणाले, बळजबरीने महाविकास आघाडी सरकार पाडले गेले. शिवसेना फोडली. महाराष्ट्रातील हे राजकीय नाट्य संपूर्ण देशाने बघितले. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. कायद्याने ठाकरे गटाची बाजू भक्कम आहे. त्यामुळे आमच्याच बाजूने निकाल लागणार आहे. न्यायालयाचा निकाल मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या आमदारांना सत्तेपासून खाली खेचणारा ठरणार आहे, असा दावा खासदार राऊत यांनी केला.

यावेळी राऊत यांनी भाजपवरही निशाणा साधला. ते म्हणाले, भाजपकडे राम मंदिराचा मुद्दा शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे ते आता लव्ह जिहादचा मुद्दा पुढे करत आहेत. त्या आधारावरच मते मागण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र त्यांच्या थापांना जनता भुलणार नाही. निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असेही खासदार राऊत म्हणाले.

सत्ताधारी भाजप हिंदू व मुसलमानांमध्ये तेढ निर्माण करत आहे. मोदी- शाह यांनी द्वेषाची बीजे रावू नयते. कारण येथे कोणीही अमर नाही, हे त्यांनी विसरु नये,अशी टीकाही राऊत यांनी केली. त्यामुळे या टीकेला भाजप कसे उत्तर देणार हे बघावे लागेल.

गेल्यावर्षी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यांच्या सोबत सेनेचे आमदारही बाहेर पडले. भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेसे संख्याबळ गोळा करुन शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकार पाडले. त्यानंतर शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली. तर देवेंद्र फडणवीस हे उप मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून शिंदे व ठाकरे गट यांच्यात शाब्दीक वाद सुरु झाले. खासदार राऊत हे शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यांच्या टीकेला शिंदे-फडणवीस सरकारमधील नेते प्रत्युत्तर देतात.

First Published on: January 1, 2023 7:04 PM
Exit mobile version