अंधेरी पूर्व पोटनिवडणूक रंगणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध भाजपा!

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक रंगणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध भाजपा!

मुंबई : राज्यात गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या नाट्यपूर्ण घडामोडीं घडत असून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीनिमित्त हे त्या शिगेला पोहोचल्या आहेत. 3 नोव्हेंबर 2022 रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी भाजपाकडून मुरजी पटेल यांना रिंगणात उतरवले जाणार आहे. गुरुवारी रात्री उशिरा हा निर्णय घेण्यात आला. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ऋतुजा लटके यांच्या नावाची घोषणा यापूर्वीच केली आहे. एकूणच ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष उतरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कोणत्याही निवडणुकीत शिवसेना-भाजपा विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे चित्र यापूर्वी राज्यात पाहायला मिळायचे. पण शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे राजकारण या दोन गटांभोवतीच फिरत आहे. पण गुरुवारी रात्री वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांच्यात चर्चा झाली. त्या बैठकीत ही जागा भाजपाने लढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

शिवसेनेचे आमदार दिवंगत रमेश लटके यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, त्या मुंबई महापालिकेच्या कर्मचारी असल्याने त्यांनी महिनाभर आधी राजीनामा देणे बंधनकारक होते. ऋतुजा लटके यांनी 2 सप्टेंबर रोजीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पण राजीनामापत्रात त्रुटी असल्याचे सांगत, तो परत देण्यात आला. त्यानंतर त्यांनी पुन्हा 3 ऑक्टोबर रोजी नव्याने राजीनामा दिला. पण पालिका प्रशासनाने राजीनामा न स्वीकारल्याने ऋतुजा लटके यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयाने पालिकेची कानउघाडणी करत राजीनामा स्वीकारण्याचे आदेश दिले.

तर, दुसरीकडे भाजपा ही जागा लढविणार असून त्यांच्या मुरजी पटेल यांना युतीचा उमेदवार म्हणून पाठिंबा देऊन शिंदे गट प्रचारही करणार आहे. आज (शुक्रवारी) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल हे दोघेही अर्ज दाखल करणार आहेत. 6 नोव्हेंबर 2022 रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

यापूर्वीच तीन उमेदवारांचे अर्ज दाखल
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाकरिता राकेश विश्वनाथ अरोरा (क्रांतिकारी जय हिंद सेना) आणि (हिंदुस्तान जनता पार्टी), मिलिंद काशिनाथ कांबळे (अपक्ष) आणि नीना गणपत खेडेकर (अपक्ष) यांनी याआधीच आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आज (शुक्रवारी) अर्ज सादर करण्याचा अखेरचा दिवस असल्याने ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल यांच्याव्यतिरिक्त आणखी अर्ज सादर होण्याची शक्यता आहे.

First Published on: October 14, 2022 10:09 AM
Exit mobile version