ढोकळा… ठेचा… खोक्यांचा हिशेब…, ठाकरे-शिंदेंमध्ये रंगला सामना

ढोकळा… ठेचा… खोक्यांचा हिशेब…, ठाकरे-शिंदेंमध्ये रंगला सामना

मुंबई : गोरेगावच्या नेस्को मैदानात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांचा मेळावा घेतला होता. तर, दुसरीकडे राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध राज्यांच्या पक्षप्रमुखांचा मेळावा घेतला. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा मुख्य रोख भाजपाकडे असल्या तरी, मधे मधे त्यांनी शिंदे गटावरही टीकास्त्र सोडले. तोच संदर्भ घेत एकनाथ शिंदे यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. त्यामुळे ढोकळा… ठेचा… खोक्यांचा हिशेब… असा दोघांमध्ये सामना रंगल्याचे पाहायला मिळाले.

मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी भाजपाबरोबरच शिवसेनेच्या दोन्ही गटांनी कंबर कसली आहे. गणेशोत्सवात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पालिकेसाठी 150 जागांचे लक्ष्य असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर आज शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या प्रमुखांचा सामना रंगला. उद्धव ठाकरे यांनी, ही पहिलीच लढाई असल्याचे समजून तयारी लागा, असा आदेश शिवसैनिकांना दिला.

शिंदे गटावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी त्यांचा ‘मिंधे गट’ असा उल्लेख केला. तसेच शिंदे गट ढोकळा खायला गेले सुरतला गेले. आमचा वडापावचा ठेचा त्यांना गरम लागला, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्याला एकनाथ शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले. आम्ही मिंधे नाहीत, तर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खंदे कार्यकर्ते आहोत. आम्ही ठेचा खाऊनच मोठे झाले आहोत म्हणूनच त्यांना आम्ही ठेचले. त्यांना सत्तेवरून खाली खेचले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

शिंदेंचा ठाकरेंना सवाल
बाळासाहेबांच्या विचारांना घेऊन आपण पुढे जात आहोत, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी अनेकदा सांगितले आहे. हाच संदर्भ घेऊन, मुले पळवणारी टोळी आपण ऐकली आहे, पण बाप पळवणारी औलाद महाराष्ट्रात फिरत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावरही एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. आम्हाला जर बाप पळवणारे म्हणत असाल तर, तुम्हाला बापाचा पक्ष आणि विचार विकणारी टोळी म्हणायचे का?, असा सवाल त्यांनी केला. सत्तेच्या लालसेने बाळासाहेबांचे विचारांना उद्धव ठाकरे यांनी तिलांजली दिली, असे ते म्हणाले. आम्हाला गद्दार म्हटले जाते, पण तुम्ही जनतेने दिलेल्या कौलाशी गद्दारी केली. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. हे लोकांना ठाऊक आहे. ये पब्लिक है सब जानती है, असे ते म्हणाले.

‘सर्व हिशेब माझ्याकडे’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गल्लीत गोंधळ असताना दिल्लीत मुजरा करायला जातात. ‘खोके सरकार’ अशी यांची ख्याती झाली आहे. त्यांनी आधी खोक्यातून बाहेर यावे आणि मग भ्रष्टाचारावर बोलावे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर, माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला मी मदत करत असतो. मी देण्याचे काम करत असतात. काही जण घेण्याचेच काम करतात. आम्हाला ‘खोके’ बोलतात. पण सर्व हिशेब माझ्याकडे आहे. बाकी कोणाकडे असणार, वेळ आल्यावर बोलेनच, असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.

‘तीन महिन्यांपूर्वीच आसमान दाखवले’
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी शिवसेनेला जमीन दाखवण्याचे भाष्य केले होते. त्याचा समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला. महापालिका निवडणुकीत त्यांना आपण आसमान दाखवू, असे ते म्हणाले. ठाकरे सरकारला तीन महिन्यांपूर्वीच सत्तेवरून पायउतार करून आसमान दाखवले होते, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. यापूर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री शिंदे यांचा कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला जात होता. त्याचाही समाचार शिंदे यांनी घेतला. मी शेतकऱ्यांचे भले करण्याचे तसेच समाजाचा विकास करण्याचे कंत्राट घेतले आहे, असे ते म्हणाले.

First Published on: September 21, 2022 10:55 PM
Exit mobile version