…मग नियुक्ती का झाली याचे उत्तर द्या, काँग्रेसचा आशीष शेलार यांना सवाल

…मग नियुक्ती का झाली याचे उत्तर द्या, काँग्रेसचा आशीष शेलार यांना सवाल

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेच्या उपाध्यक्षपदी अजय आशर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावरून आता भाजपा विरुद्ध काँग्रेस आणि शिवसेना असा वाद रंगला आहे. त्यांची नियुक्ती का झाली याचे उत्तर द्या, असा सवाल काँग्रेसने भाजपाला केला आहे. तर, ‘खोके दर्शन’ झाले का? असा प्रश्न शिवसेनेने विचारला आहे.

केंद्राच्या निती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘मित्र’ची स्थापना करण्यात आली आहे. मित्रच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सहअध्यक्षपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून संस्थेच्या उपाध्यक्षपदी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अजय आशर आणि शिवसेनेचे माजी आमदार डॉ. राजेश क्षीरसागर यांची शिंदे-फडणवीस सरकारने शुक्रवारी नियुक्ती केली आहे. ठाण्यातील प्रसिद्ध बिल्डर अजय आशर हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय ओळखले जातात.

विशेष म्हणजे, मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजय आशर यांच्यावरून भाजपाचे आमदार आशिष शेलार आणि किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. विधानसभेत याच संदर्भात शेलार यांनी आधी केलेल्या आरोपांचा व्हिडीओ ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्वीट केला आहे. तुम्हाला तुमच्याच व्हिडियोची आठवण करून द्यावीशी वाटली. ज्या अजय आशर यांच्यावर आपण आरोप केला, ते आशर तुम्ही तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून काढले की तुमच्या पक्षाला ‘खोके दर्शन’ झाले? कारण त्यांना तुम्ही सत्तेचा लाभार्थी करून टाकले, अशी बोचरी टीका त्यांनी या ट्वीटमधून केली आहे.

तर, आशिष शेलार यांनी आज, शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या आरोपांवर आपण आजही ठाम असल्याचे सांगितले. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. मविआने आरोप केला नाही तुम्ही केला, मग तुम्ही कधी क्लीन चिट दिली? का भाजपाची वॉशिंग मशीन लागू पडली? राजकीय टीका व भ्रष्टाचाराचे आरोप एक कसे? आता राज्याचे निर्णय मंत्रालयाबाहेर होणार का? अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली आहे. तुम्ही आजही विचारलेल्या प्रश्नावर ठाम आहात, असे म्हणता मग नियुक्ती का झाली याचे उत्तर द्या. अतार्किक आक्रस्ताळेपणाने बोलून वा विरोधकांवर अश्लाघ्य भाषा वापरून विषय दबत नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे.

आशिष शेलारांनी काय आरोप केला होता?
नगरविकास विभागाच्या कारभारात मंत्रालयाबाहेरील व्यक्ती असणाऱ्या अजय आशर यांचा हस्तक्षेप वाढल्याचा आरोप आशीष शेलार यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केला होता. नगरविकास विभागाचा कारभार चालवणारा आशर कोण? मंत्रालयात बसलेल्या अधिकाऱ्यांच्या ते वर आहेत का? विभागाचे निर्णय अजय आशर घेतात का, असे प्रश्न शेलार यांनी केले होते.

First Published on: December 3, 2022 5:42 PM
Exit mobile version