दसरा मेळावा : सुटणार वाग्बाण … कोण होणार घायाळ? कोण साजरा करणार विजय?

दसरा मेळावा : सुटणार वाग्बाण … कोण होणार घायाळ? कोण साजरा करणार विजय?

मुंबई : राज्यात आज ऐतिहासिक ‘सामना’ रंगणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील फुटीर गटाचा वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) मैदानावर दसरा मेळावा होणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होत असून त्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे एकाच वेळी भाषण होणार आहे. दोन्ही दसरा मेळाव्यांसाठी अवघे काही तासच उरले आहेत.

राज्यात सध्या ‘ना भूतो ना भविष्यति’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतरच राज्यात एकापाठोपाठ एक अशा अनपेक्षित राजकीय घटना घडत आहेत. रा्ष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासमवेत भाजपाने सत्ता स्थापन करणे आणि ते कोसळल्यावर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसबरोबर आघाडी करत सरकार बनवणे या दोन्ही गोष्टी अनपेक्षित होत्या. पण त्यानंतर शिवेसनेत उभी फूट पडून तब्बल 40 आमदारांनी उठाव केला आणि ठाकरे सरकार खाली खेचले. आता शिवसेनेच्या या फुटीर गटाने भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे सध्या विधान भवनात सत्तेत भाजपासमवेत शिवसेना आणि विरोधातही दोन्ही काँग्रेसबरोबर शिवसेना असे अभूतपूर्व चित्र पाहायला मिळत आहे.

शिवसेना पक्षावर दोन्ही गटाने दावा केला आहे. आधी हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात गेले. आता सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा निवडणूक आयोगाकडे सोपविले आहे. त्याचा फैसला अद्याप न झाल्याने यंदा दोन्ही गटाकडून दसरा मेळावा साजरा होत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला प्रारंभ केला होता. आता त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांचा मेळावा त्याच शिवाजी पार्कवर होणार असून एकनाथ शिंदे यांचा बीकेसीत होणार आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूक आणि त्याआधी अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणूक होत असल्याने यानिमित्त दोन्ही गटांकडून शक्तिप्रदर्शन केले जाईल.

आतापर्यंतचा आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला पाहता दोन्ही गट एकमेकांवर शरसंधान करणार हे निश्चित आहे. ठाकरे कुटुंबीयांबद्दल अवाक्षरही ऐकून घेणार नाही, अशी आधी भूमिका घेणाऱ्या शिंदे गटाकडून आता वारंवार ठाकरे कुटुंबीयांवर टीका केली जात आहे. तर दुसरीकडे, 21 सप्टेंबरला गोरेगावच्या नेस्को मैदानात झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी प्रामुख्याने भाजपालाच लक्ष्य केले होते. पण अलीकडच्या काळात शिंदे गटातील नेत्यांकडून होत असलेल्या टीकेमुळे कदाचित उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यालाही प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही मेळाव्यातील लाखो उपस्थितांसमोर शिवसेनेच्या दोन्ही व्यासपीठांवरून वाग्बाण सुटणार आहेत. त्यात कोण घायाळ होईल आणि कोण विजय साजरा करील, हे नजीकच्या काळात स्पष्ट होईलच.

First Published on: October 5, 2022 3:56 PM
Exit mobile version