शरद पवार बोलले की, उद्धव ठाकरेंना बोलावेच लागते, देवेंद्र फडणवीसांचा टोला

शरद पवार बोलले की, उद्धव ठाकरेंना बोलावेच लागते, देवेंद्र फडणवीसांचा टोला

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारताचे दैवत आहेत, आदर्श आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल कुठला वादही होऊ शकत नाही. पण याविषयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. आता ते बोलल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांनी बोलणे क्रमप्राप्त होते, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वादंग निर्माण झाले होते. खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यपालांनी जिथे हे वक्तव्य केले, त्यावेळी शरद पवार तिथे उपस्थित होते. मात्र, त्यांनी त्यावेळी कोणत्याही प्रकारचे भाष्य केले नव्हते. परंतु त्यांनी आज राज्यपालांवर निशाणा साधला. शिवरायांबाबत बोलताना राज्यपालांनी आपली मर्यादा सोडली. राज्यपालांच्या या विधानाची राष्ट्रपतींनी दखल घ्यावी आणि राज्यपालपदावर जबाबदार व्यक्तीची निवड करावी, असे ते म्हणाले.

तर, उद्धव ठाकरे यांनीही आज राज्यपालांवर जोरदार टीका केली. राज्यपाल निष्पक्ष असावा, राज्यात काही पेचप्रसंग निर्माण झाला तर त्याची सोडवणूक त्यांनी करावी. पण आपले राज्यपाल काहीही बोलत सुटतात. आता राज्यपालांनी जे काही बोलले आहेत, ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आता जर राज्यपालांना हटवले गेले नाही तर या महाराष्ट्रद्रोह्यांचा विरोध करण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे. वेळ आली तर शांततापूर्ण मार्गाने महाराष्ट्र बंद करू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

याबाबत पत्रकारांनी विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती उदयनराजे यांनी आपल्या पत्रात काही मुद्दे उपस्थित केले आणि त्यानंतर शरद पवार यांनी त्यावर मत मांडावे लागले. आपल्या समोर घटना घडली आणि आपण त्यावर प्रतिक्रिया दिली नाही, हे छत्रपती उदयनराजेंनी लक्षात आणून दिल्यानंतर आज पवार यांनी प्रतिक्रिया दिली. आता पवार साहेब बोलल्यावर उद्धव ठाकरे यांना बोलणे क्रमप्राप्तच होते. या संपूर्ण विषयाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न चाललेला आहे, असा आरोप त्यांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारताचे दैवत आहेत, आदर्श आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल कुठला वादही होऊ शकत नाही. त्यावर राजकारण करणे योग्य नाही. उद्धव ठाकरे काय बोलले मी ऐकलेले नाही. त्यामुळे त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही, असेही ते म्हणाले.

First Published on: November 24, 2022 10:22 PM
Exit mobile version